

खेड : मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याची दुसरी मार्गिका मंगळवार पासून वाहतुकीस खुली करण्यात आली आहे . त्यामुळे शिमगोत्सवा पूर्वी कोकणवासीयांना थोडा दिलासा मिळणार आहे.
शिमगोत्सवाच्या कालावधीत कोकणात मुंबई व पुणे येथून येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या अधिक असते. त्यातच महामार्गाचे चौपदरीकरण काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे कशेडी बोगद्यातून वाहतूक सुरु झाल्यास काही अंशी वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.
कशेडीच्या पहिल्या लेनमधून गणेशोत्सव काळात वाहनांना दुतर्फा ये जा करण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु ही वाहतूक धोकादायक बनली होती. त्यामुळे दुसऱ्या बोगद्याचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी होत होती. नुकताच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिह राजे भोसले यांनी महामार्गाची पाहणी करून मार्च अखेर पर्यंत कशेडी बोगद्यातून दुसऱ्या मार्गिकेतून प्रवास सुरू होईल असे सांगितले होते. मंगळवार दि.११ रोजीच दुसऱ्या बोगद्यातून वाहनान मुंबई हून गोव्याच्या दिशेने जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोकणात सध्या शिमगोत्सवाची धूम सुरू आहे, कोकणातील प्रमुख सणांपैकी एक सण असलेल्या शिमगा उत्सवाला मुंबईतून लाखो चाकरमानी गावी येतात. या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांचा प्रवास सुखद सुरक्षित आणि सुसाट होण्यासाठी कशेडी बोगद्याची दुसरी लेन सुरू झाली आहे. दुसरी लेन वाहनचालकांसाठी उपयुक्त ठरत आहे.