

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी सकाळच्या सुमारास वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तीन अपघातांच्या मालिकेने रत्नागिरी तालुका हादरला. हातखंबा हायस्कूलजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर निवळी आणि झरेवाडी येथे झालेल्या इतर दोन अपघातांमध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनांमुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पहिला अपघात हातखंबा हायस्कूलसमोरील वळणावर घडला. पाली-गराटेवाडी येथील मंगेश मधुकर भस्मे (वय 42, रा. पाली-गराटेवाडी) हे आपल्या अॅक्सेस दुचाकीवरून रत्नागिरीकडे येत असताना, समोरून आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, मंगेश भस्मे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. दुसरी घटना निवळी येथे घडली, जिथे करबुडे येथील रवींद्र गोविंद पाचकुडे (वय 43, रा. करबुडे-पाचकुडेवाडी) हे पत्नी अस्मिता यांच्यासह दुचाकीवरून प्रवास करत होते.
समोरून येणार्या ट्रेलर चालकाने चुकीच्या बाजूला येऊन त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात पाचकुडे दांपत्य रस्त्यावर फेकले गेले, ज्यात रवींद्र यांना गंभीर दुखापत झाली आहे.
तिसरा अपघात हातखंबा-झरेवाडी येथे घडला. खेडशी येथील पियूष भारती (वय 19, रा. खेडशी-गयाळवाडी) आणि त्याचा मित्र ऋषिकेश बावधने (वय 24, रा. पांगरी) हे दुचाकीवरून जात असताना, पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणार्या ट्रकला धडकले. यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
या तिन्ही घटनांची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामे केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आणि जखमींना उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.