

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथील धोकादायक वळणावर सोमवारी (दि.२८) रात्री उशिरा गॅसने भरलेला एक टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट २५ फूट खोल दरीत कोसळला.
या भीषण अपघातानंतर टँकरमधून वायूगळती सुरू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. प्रशासनाने तात्काळ खबरदारीचा उपाय म्हणून महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबवली आणि परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. या बचावकार्यामुळे महामार्गावर तब्बल १५ तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. अखेर मंगळवारी (दि.२९) दुपारी प्रशासनाच्या अथक प्रयत्नांनंतर वाहतूक पूर्ववत झाली.
नेमका अपघात कसा घडला होता?
सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सय्यद खाजा पाशा (वय ५०, रा. हैदराबाद) हे आपल्या ताब्यातील एलपीजी टँकर (एपी-३९-टीएफ-०१५७) घेऊन जयगडहून कोल्हापूरच्या दिशेने निघाले होते. हातखंबा येथील अवघड वळणावर भरधाव टँकरवरील त्यांचा ताबा सुटला आणि टँकर पुलावरून खाली दरीत कोसळला.
या अपघातात चालक सय्यद पाशा जखमी झाले असून, त्यांना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थेच्या रुग्णवाहिकेतून तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात टँकरचे मोठे नुकसान होऊन त्यातून वायूगळती सुरू झाली. याप्रकरणी जखमी चालक सय्यद पाशा यांच्याविरोधात हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती हातखंबा गावचे पोलीस पाटील औकित तारवे यांनी दिली.
अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासह पोलीस आणि महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वायूगळतीमुळे कोणताही अनर्थ टाळण्यासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूंची वाहतूक तातडीने थांबवण्यात आली. प्रशासनाने नागरिकांना अपघातस्थळाच्या परिसरात न जाण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले. रात्री उशिरा घटनास्थळी रेस्क्यू व्हॅन आणि दुसरा रिकामा टँकर दाखल झाला. मंगळवारी दुपारपर्यंत अपघातग्रस्त टँकरमधील वायू सुरक्षितपणे दुसऱ्या टँकरमध्ये स्थलांतरित करण्यात आला. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त टँकर बाजूला करण्यात आला आणि तब्बल १५ तासांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.
अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने वाहतूक पर्यायी मार्गांनी वळवली होती:
मुंबईकडे जाणारी वाहतूक: पाली येथून बावनदी मार्गे.
रत्नागिरीकडे येणारी वाहतूक: हातखंबा येथून झरेवाडी, चांदेराई मार्गे.
लांजाकडे जाणारी वाहतूक: रत्नागिरीतून काजरघाटी, देवधे मार्गे.