

रत्नागिरी : लालपरी ही सर्व सामान्य प्रवाशांची आधार बनली आहे. लांब पल्ल्याच्या एसटी बसेसमध्ये प्रवास करताना अचानक एसटी बस बंद पडल्यास आता तातडीने प्रवाशांना विनाशुल्क बस उपल्ध होणार आहे. वातानुकूलित, निमआराम, आरामबसमधून प्रवाशांना विनाशुल्क व तातडीने प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देणे बंधनकारक केले आहे. शिवशाही, ई-शिवाई, शिवनेरीसह इतर बसेसमध्ये प्रवेश नाकारल्यास, तिकिटाच्या फरकाच्या पैशासाठी अडवणूक केल्यास संबंधित वाहक-चालकांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
सर्वसामान्य प्रवासी, व्यापारी, बाहेरील प्रवासी हे नेहमी लालपरीनेच प्रवास करतात. त्यामुळे दिवसेंदिवस लालपरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे. लांब पल्ल्याच्या प्रवाशासाठी नवीन लाल परी लिहिलेल्या बसेस सोडण्यात आल्यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवास करण्यास मिळत असून नवीन बसेस प्रवाशांच्या पसंतीस उतरल्या आहेत. दरम्यान, लांब किंवा ग्रामीण मार्गावर प्रवास करत असताना बस अचानक बंद पडली तर प्रवाशांना ताटकळत तासनतास बसावे लागते. अनेकवेळा निर्मनुष्य, आडवळणावर एसटी बंद पडते. अशावेळी महिला, वयोवृध्द, मुले एकूणच प्रवाशांचे हाल होतात. पर्यायी बस उपलब्ध होत नाही, शिवाय अनेक बसेस जागा नाही सांगून प्रवाशांना बसमध्ये घेण्याचे टाळतात. त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय पाहता परिवहन मंत्री सरनाईक यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रत्नागिरी विभागातून प्रवासी जर लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करीत असतील आणि मध्येच बसबंद पडल्यास त्यांना पाठीमागून येणाऱ्या बसेसमध्ये विनाशुल्क बसवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.