

रत्नागिरी : जिल्ह्ययासह राज्यभरात गर्दीच्याठिकाणी आता अत्याधुनिक राजमाता जिजाऊ बसेस धावणार आहेत. नुकतेच या बसचे उद्घाटन मुंबईत करण्यात आले. एसटी महामंडळाच्या ताफ्यात तब्बल 3 हजार बसेस दाखल होणार आहेत. त्यापैकी रत्नागिरी विभागास 100 बसेस मिळणार आहेत. टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील 9 आगारात या बसेस दाखल होतील. सीसीटीव्ही कॅमेरे, 3 बाय 2 आसन क्षमता यासह कोकणातील प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळणार असून प्रवास ही आरामदायी होणार आहे.
महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाने यापूर्वी शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती, हिरकणी अशा ऐतिहासिक नावांनी बससेवेला वेगळी ओळख दिली. त्यानंतर एसटीमध्ये नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. राजामात जिजाऊ या बसेस दाखल होणार आहेत. जिल्हातंर्गत प्रवास करताना कित्येक प्रवाशंना जागेअभावी उभे राहून प्रवास करावा लागत होता. प्रवाशांची ही अडचण लक्षात घेता एसटी महामंडळाने आता 3 बाय 2 आसन क्षमतेच्या बसेस घेतल्या आहेत. तब्बल 3 हजार राजामाता जिजाऊ बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार असून या योजनेची सुरूवात नागपुरातून होणार असून त्याठिकाणी 50 बसेस सुरूवातीला येणार आहेत. त्यानंतर टप्प्याने इतर जिल्ह्यांना बसेस देण्यात येतील.
दरम्यान, रत्नागिरी विभागात 100 हून अधिक बसेस येणार आहेत. त्यामुळे कोकणकरांना आता अत्याधुनिक बसचा अनुभव घेता येणार आहे. रत्नागिरी, राजापूर, लांजा, देवरुख, संगमेश्वर, गणपतीपुळे, चिपळूण यासह गर्दीच्या ठिकाणी याबसेस पहिल्या टप्प्यात धावणार आहेत.
जादा सीट अन प्रवाशांना आरामदायी प्रवास
सध्याच्या एसटी बसेसमध्ये एका आसनावर दोघे प्रवासी बसत होते. आताच्या नव्या बसेसमध्ये असानाच्या तुलनेत जादा सीट आहेत. 3 बाय 2 आकाराची रचना असल्यामुळे तीन प्रवासी बसू शकतात. त्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी आणि सुलभ प्रवास होणार आहे. या बस अतिगर्दीच्या मार्गावर चालवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे.