

रत्नागिरी : खासगी ट्रॅव्हल्सशी स्पर्धा करत प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) कात टाकण्यास सुरुवात केली आहे. महामंडळाच्या ताफ्यात लवकरच २०० अत्याधुनिक एसी व्होल्वो बस दाखल होणार असून, त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे. एसटी महामंडळ आता पूर्ण डिजिटल सेवेच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
महामंडळातर्फे २५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या तसेच पाच ते सहा तासांच्या प्रवासासाठी ४४ आसनी आरामदायी बस चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत सर्वसामान्यांना विश्वासार्ह सेवा देणाऱ्या एसटीचा प्रवास आता आधुनिक आणि वातानुकूलित होणार आहे. प्रत्येक विभागाला या बस उपलब्ध करून देण्यात येणार असून, मार्गांचा अभ्यास करून त्यानुसार बसचे वितरण केले जाणार आहे.
खासगी संस्थेचीही घेतली जाणार मदत
खासगी ट्रॅव्हल्सच्या धर्तीवर सेवा देण्यासाठी नव्या बसमध्ये आतिथ्य व्यवस्थापनासाठी खासगी संस्थेची मदत घेतली जाणार आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासह आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे.
आरामदायी प्रवास
दिवसा ४४ आसनी आरामदायी एसी बससेवा देण्याचे नियोजन आहे. तर रात्री लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी स्लिपर कोचची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या बसमधून विविध प्रवासी सवलती देण्याबाबतही महामंडळाकडून विचार सुरू आहे.
मागणीनुसार मार्ग ठरणार
ऑनलाईन सुविधेमुळे प्रवाशांना घरबसल्या तिकीट आरक्षित करता येणार आहे. एसी व्होल्वो बस कोणत्या मार्गावर सुरू करायची, यासाठी प्रवाशांची मागणी आणि मार्गाची व्यवहार्यता यांचा अभ्यास केला जाणार आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, संभाजीनगर यांसारख्या लांब पल्ल्याच्या मार्गांचा यामध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. अंतिम मार्ग निश्चित झाल्यानंतर ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.