

राजापूर : राजापूर तालुक्यातील सौंदळ येथील हॉल्ट स्थानकाचे कायमस्वरूपी क्रॉसिंग रेल्वे स्थानकात रुपांतर व्हावे, या स्थानकावर अन्य सेवा सुविधांची निर्मती करून अन्य एक्स्प्रेस गाड्याही या स्थानकात थांबाव्यात, या मागणीसाठी सौंदळ पंचक्रोशीतील सरपंच व ग्रामस्थांसह प्रवाशांनी केलेल्या प्रयत्न व पाठपुराव्यांना लवकरच यश येणार आहे. या प्रश्नी खासदार नारायण राणे यांनी दखल घेतली असून लवकरच सौदळ स्थानक परिसरात भेट देऊन खा. राणे हे या भागातील जनतेशी संवाद साधणार आहेत.
सोमवारी याप्रश्नी भाजपा जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर यांनी खा. राणे यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली असता खा. राणे यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिल्याची माहिती नागरेकर यांनी दिली आहे.
राजापुर तालुक्यात सौंदळ येथील हॉल्ट स्थानक आहे. मात्र, या हॉल्ट स्थानकाचे स्थानकात रूपांतर व्हावे, अशी स्थानिक जनतेची मागणी आहे. तर अन्य सेवा सुविधांची निर्मती करावी व या स्थानकात अन्य एक्स्प्रेस गाडयांनाही थांबा मिळावा, अशी या परिसरातील जनतेची मागणी आहे. यासाठी या भागातील सरपंच, ग्रामस्थ व प्रवाशी संघटना यांनी भाजपा जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर यांची भेट घेऊन याबाबत खा. राणे यांच्याकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी केली होती.
यासाठी नागरेकर यांनी सोमवारी कणकवली येथे खा. राणे यांची भेट घेतली व हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. यावर संसदेचे अधिवेशन सध्या सुरू असून ते संपल्यावर आपण प्रत्यक्षात सौंदळ गावात व स्थानकावर भेट देऊन तेथील आजी, माजी लोकप्रतिनिधी ग्रामस्थांशी व प्रवासी संघटनांशी चर्चा करू. यावेळी रेल्वेच्या अधिकार्यांनाही बोलावून माहिती घेऊन योग्य पध्दतीने याचा पाठपुरावा करून हा प्रश्न सोडवू अशी ग्वाही खा. राणे यांनी दिल्याचे नागरेकर यांनी सांगितले. या प्रसंगी रवींद्र नागरेकर यांच्यासह समिर खानविलकर, संदीप बारस्कर, अरविंद लांजेकर, नीलेश बांदरकर, मंदार नारकर आदी उपस्थित होते.