

लांजा : मुंबईहून गोव्याच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या मालवाहू ट्रकला अपघात होऊन ट्रक जळून खाक झाल्याची घटना शनिवारी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अंजणारी घाटातील तीव्र उतारावर घडली.
हा ट्रक मुंबई येथून केमिकल पावडर घेऊन गोव्याच्या दिशेने निघाला होता. ट्रक दुपारी ४.३० वाजण्याच्या दरम्यान अंजणारी घाटात तीव्र उतारावर आला असता ट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व महामार्गावरून जाणाऱ्या दुसऱ्या एका ट्रकला जोरदार धडक दिली व ट्रक महामार्गाच्या एका बाजूला दरडीवर जाऊन आदळून कलंडला. यावेळी ट्रकने अचानक पेट घेतला. सुदैवाने यातील चालक व क्लीनर यांनी बाहेर उड्या मारल्याने ते जखमी झाले. जखमींना लांजा ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलिस व हातखंबा वाहतूक पोलिस हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व मदत कार्य केले. तसेच, महामार्गावरील वाहतूक नियंत्रणात आणली व एकेरी वाहतूक सुरू केली. सुदैवाने समोरून कोणतेही वाहन आले नाही; अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. अपघाताची माहिती मिळताच काहीवेळातच रत्नागिरी औद्योगिक प्राधिकरण यांचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला.