Ratnagiri Rain Updates : जिल्ह्यात मान्सूनचे आगमन; राजापुरात दमदार ‘बॅटिंग’

चिपळूण, संगमेश्‍वर तालुक्‍यांत रिमझिम पाऊस
Ratnagiri heavy rain
Ratnagiri heavy rainPudhari Photo
Published on
Updated on

रत्नागिरी : जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी विविध तालुक्यांमध्ये पावसाची तीव्रता वेगवेगळी दिसून आली. राजापूर तालुक्यात रविवारी सायंकाळी मान्सूनने दमदार हजेरी लावत जोरदार बरसात केली, तर चिपळूण व संगमेश्‍वर तालुक्‍यांत पावसाने रिमझिम पडत सलामी दिली. लांजा व रत्नागिरी तालुक्यांत अद्याप समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

राजापूर तालुक्यात सायंकाळी ४.१५ वाजता काळ्याकुट्ट ढगांची गर्दी, विजांचा कडकडाट आणि गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. शहरासह ग्रामीण भागाला या पावसाने अक्षरशः झोडपून काढले. पहिल्याच दमदार सरींमुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. कोरड्या धरतीवर बरसलेल्या पावसामुळे परिसरात मातीचा सुगंध दरवळला असून शेतकरीवर्गातही समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दुसरीकडे लांजा तालुक्यात सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. आकाशात काळे ढग दाटून आले होते. मात्र जोरदार वाऱ्यामुळे पावसाचे ढग पुढे सरकल्याने अपेक्षित पाऊस झाला नाही. काही भागांत हलक्या सरी कोसळल्या असल्या तरी तालुकाभर समाधानकारक पर्जन्यवृष्टी झालेली नाही. त्यामुळे शेतकरी व नागरिकांची नजर अद्याप आकाशाकडे लागून आहे.

रत्नागिरी तालुक्यातही दिवसभर ढगाळ वातावरण होते. काहीठिकाणी तुरळक सरी पडल्या, तर बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली नाही. समुद्रकिनारी भागात वाऱ्याचा वेग वाढला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मान्सूनचे आगमन झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

दरम्यान, हवामान विभागाने कोकण किनारपट्टीवर पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मान्सून सक्रिय होत असल्याने खरीप हंगामाच्या तयारीला वेग येणार असून शेतकरी वर्गाला समाधानकारक पावसाची अपेक्षा आहे. प्रशासनानेही नागरिकांना विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news