

खेड : तालुक्यात ७ ऑगस्ट एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या एका शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. खेड-भरणे मार्गावरील एसटी बसमध्ये प्रवासादरम्यान संबंधित वाहकाकडून हा प्रकार घडल्याचे विद्यार्थिनीने सांगितल्याची माहिती असून, या घटनेमुळे खेड तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
या घटनेनंतर विद्यार्थिनींच्या सार्वजनिक वाहतुकीतील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी शाळेत पोहोचल्यानंतर तिने प्रवासादरम्यान घडलेला प्रकार मुख्याध्यापकांना कथन केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्याध्यापकांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून विद्यार्थिनीचा जबाब नोंदविण्यासह संबंधितांकडून माहिती घेतली जात आहे. घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिक आणि प्रवासी मोठ्या संख्येने खेड बसस्थानकात जमा झाले.
संतप्त नागरिकांनी एसटी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत एसटी प्रशासनाने अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच खेडचे माजी आमदार संजय कदम यांनीही तातडीने खेड बसस्थानकात धाव घेतली. त्यांनी एसटी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून घटनेची सविस्तर माहिती घेत संबंधित वाहकावर तातडीने निलंबनासह कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
पोलिसांच्या कारवाईतील विलंबाबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. दोषीवर तातडीने कठोर कारवाई न झाल्यास नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन छेडण्याचा इशाराही माजी आ. कदम यांनी दिला. महिलांच्या आणि शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेशी तडजोड सहन केली जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली