

Dapoli bakery bun pav fungus
दापोली : दापोली एसटी स्टँड येथे असलेल्या एका नामांकित दुकानातून घेतलेल्या बनपावमध्ये बुरशी आढळल्याने ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. शहरातील गजबजलेल्या ठिकाणी अशा दर्जाहीन वस्तू विक्रीस ठेवण्यात आल्याने अन्नसुरक्षा विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 22 ऑक्टोबर रोजी एका ग्राहकाने संबंधित दुकानातून बनपाव खरेदी केला. मात्र, घरी आल्यानंतर पाव खाण्यास घेतला असता त्यात बुरशी असल्याचे आढळले. हा प्रकार पाहून ग्राहक अवाक् झाला.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत, “अन्नसुरक्षा विभाग झोपेत आहे का?” असा थेट सवाल उपस्थित केला आहे. प्रतिष्ठित दुकान असूनही अशा अस्वच्छ वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्याने प्रशासनाच्या तपासणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागरिकांनी प्रशासनाने तातडीने या दुकानाची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. “ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे. दरम्यान, गुहागर शृंगारतळीत पेढ्यातून झालेली नागरिकांना विषबाधा यातून अद्याप अन्नसुरक्षा विभागाने धडा घेतलेला दिसत नाही असे नागरिक बोलत आहेत.