

रत्नागिरी : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात मोठ्या निर्णायक लष्करी कारवाईची तयारी सुरू केली आहे. त्याची सुरुवात 7 मे रोजी होणार आहे. जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी 4 वा. पाच ठिकाणी ‘मॉक ड्रिल’ होणार आहे. या ठिकाणी सायरन वाजविला जाणार असून, या कालावधीत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले.
मंगळवारी ‘मॉक ड्रिल’संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मंगळवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, सहायक उपनियंत्रक धमेंद्र जाधव, संबंधित विभागाचे अधिकारी आणि नागरी संरक्षण दलाचे जिल्हा उपनियंत्रक लेफ्टनंट कर्नल प्रशांत चतुर हे दूरद़ृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
मॉक ड्रिलसाठी आरोग्य यंत्रणा, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, प्रथोमोपचार याबाबी सज्ज असणे आवश्यक आहे. यामध्ये आपदा मित्र आणि नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक यांचा समावेश करावा, जिल्ह्यातील तालुकास्तरीय यंत्रणांनी आपले नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावे, मत्स्यविभाग, बंदरे, मेरीटाईम बोर्ड, फिनोलेक्स, जेएसडब्ल्यू, अल्ट्राटेक आदी कंपन्या, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत औद्योगिक वसाहतीमधील महाविद्यालयांनी मॉक ड्रिल करुन त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करावा, अशा सूचना, जिल्हाधिकारी सिंह यांनी बैठकीत दिल्या. बैठकीच्या सुरुवातील निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी मॉक ड्रिलच्या अनुषंगाने संगणकीय सादरीकरण करुन मार्गदर्शन कलेे. देशभरातील 244 ठिकाणी युद्धादरम्यानचे मॉक ड्रिल करण्यात येणार आहे.
केंद्रीय गृहसचिवांची राज्यांच्या गृह सचिवांसोबतची बैठक पार पडली. या बैठकीत 7 मे रोजी होणार्या म़़ॉक ड्रिल होणार्या शहरांची यादी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्यात 16? ? ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे. देशभरात सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल होणार आहे. यात एअर स्ट्राईक अलर्ट सायरन, क्रॅश ब्लॅक आऊटसह विशेष प्रशिक्षण दिले जाते. युद्धजन्य परिस्थितीत शत्रू देशांच्या विमानांनी हल्ला केल्यास काय करावे, काय करू नये, याची माहिती दिली जाते. आणीबाणीच्या स्थितीत लोकांनी आपली काळजी घेण्यासह इतरांना कशी मदत करता येईल, याचे प्रशिक्षण मॉक ड्रिलमध्ये करण्यात येणार आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने नागरी संरक्षण सज्जता मजबूत करण्यासाठी ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम (मॉक ड्रिल) करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील रत्नागिरी तहसीलदार कार्यालय, रत्नागिरी रेल्वे स्थानक, राजापूर नगर परिषद, दापोली आणि संगमेश्वर तालुक्यातील प्रत्येकी एक ग्रामपंचायत येथे 7 रोजी सायंकाळी 4 वाजता ऑपरेशन अभ्यास ‘मॉक ड्रिल’ करण्यात येणार आहे.
प्रथम श्रेणी : मुंबई, उरण, तारापूर.
द्वितीय श्रेणी : ठाणे, पुणे, नाशिक, रोहा-नागोठणे, मनमाड, सिन्नर, थळ वायशेत, पिंपरी-चिंचवड.
तृतीय श्रेणी : भुसावळ, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, छ. संभाजीनगर.