

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर राज्य शासनाने विधीमंडळाच्या महत्वाच्या समित्या जाहीर केल्या आहेत. लांजा-राजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत (Kiran Samant) यांची पहिल्या टर्ममध्ये शासनाच्या अंदाज समिती आणि आश्वासन समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. आ. किरण सामंत यांच्या निवडीमुळे शिवसेनेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
विधानसभेचे अध्यक्ष यांनी बुधवारी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या अंदाज समिती आणि आश्वासन समिती सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवतात. अंदाज समितीच्या माध्यमातून राज्याच्या अर्थसंकल्पावर लक्ष ठेवले जाते. तर आश्वासन समितीच्या माध्यमातून शासनाने विधानसभेत दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी योग्य पध्दतीने होते की नाही, याचा आढावा घेत असते. या दोन्ही समित्यांवर निवड करुन, त्यांच्या कर्तुत्वाला शासनाने न्याय दिला आहे.
लांजा-राजापूर मतदार संघात विजयी झाल्यानंतर किरण सामंत यांनी छोट्याशा कार्यकाळात अनेक विकास कामांना गती दिली आहे.