

रत्नागिरी : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या माध्यमातून मुस्लिम समाज असलेल्या ठिकाणी अनेक विकासकामे झाली. मात्र निवडणुकीला कुणाच्या तरी भुलथापांना बळी पडून हा समाज महायुतीपासून दूर राहिला. परंतु त्यानंतरही महायुतीने या समाजाला अंतर दिलेले नाही. उलट देशावर प्रेम करणारा मुस्लिम समाज हा आपलाच असल्याचे आम्ही मानत आलो आहोत. मुस्लिम समाज शिवसेनेच्या पाठिशी आहे हे आजच्या प्रवेशाने दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी केले.
गुहागर तालुक्यातील पडवे येथील शेकडो मुस्लिम बांधवांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. रत्नागिरीतील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात हा प्रवेश सोहळा झाला. यावेळी बोलताना ना. सामंत यांनी मुस्लिम समाजाच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मुस्लिम बांधव आमच्या बरोबर आहेत हे आज दाखवून दिले, असे ते म्हणाले. केंद्रातील सरकार जात-पात पाहून नव्हे, तर सर्वांना समान न्याय अंगिकारुन संरक्षण देत आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर सोफिया कुरेशी यांच्यासारख्या भगिनींनी संरक्षण दलाचे नेतृत्व केले. हा देशभक्त मुस्लिम समाजाबद्दल असणारा विश्वास असून, देशावर प्रेम करणारा मुस्लिम हा आपला आहे ही भावना आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनीही देशावर प्रेम करणार्या मुस्लिमांच्या पाठिशी शिवसेना असल्याचे म्हटले होते. यापुढे काम करताना धनुष्यबाणावर मतदान झाले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
महायुतीने लाडकी बहीण योजना राबवताना त्यात दुजाभाव केला नाही. त्यामध्ये मुस्लिम बहिणींचाही समावेश असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी सर्व मुस्लिम समाज उभा करणार, असे म्हणत त्यांनी मुस्लिम समाजाला आपल्यासोबत घेण्याचा निर्धार व्यक्त केला. भविष्यात पडवे गावातील विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असेही नामदार डॉ उदय सामंती यांनी या पक्षप्रवेश कार्यक्रमात स्पष्ट केले.
यावेळी गुहागरचे माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, माजी आ. सुभाष बने, तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर, उपतालुकाप्रमुख संतोष साखरकर, तुकाराम निवाते, शिरीषकांत चव्हाण, हुमणे गुरुजी, निलेश मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पडवे सरपंच मुजीब जांभारकर यांच्यासह शाखाप्रमुख नजीर जांभारकर, यासीन टेमकर, मुर्तुझा गुहागरकर, ह्यात खले, मुस्तर खले, अमजद खले, म. इसाकभाई जांभारकर, अय्याज खले, इक्बाल इब्जी आदी उपस्थित होते.