

दापोली : दापोली शहरानजीक असलेल्या काही नामांकित हॉटेल्समध्ये परप्रांतीय तरुणी मसाजसाठी आणल्याची माहिती समोर आली आहे. एक तास मसाजसाठी दोन ते तीन हजार रुपये एवढे दर आकारले जात असून, या मसाजच्या आड काही अनैतिक धंदे तर चालविले जात नाहीत ना? असा संशय नागरिकांमध्ये व्यक्त केला जात आहे.
गेल्या आठवड्यात दापोलीत नागालँडच्या कामगाराने चार-पाच कारच्या फोडलेल्या काचा आणि नेपाळी कामगाराने केलेला सुरा हल्ला या घटनांनी परप्रांतीयांबाबत शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असतानाच आता मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या गैर प्रकारांमुळे दापोलीमध्ये खळबळ उडाली आहे. शिवाय परराज्यातील कामगारांबाबत स्थानिक नागरिकांत संशयाचे सावट आणखी गडद झाले आहे. तसेच त्यांच्याकडून आकारले जाणारे तासाला आकारले जाणारे दरही संशयास्पद असल्याचेही बोलले जात आहे. तर स्थानिकांच्या मते, या तरुणींना दबावाखाली काम करण्यास तर भाग पाडले जात नाही ना? याचाही तपास व्हावा, या दिशेनेही पोलिसांनी चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
दापोली तालुक्यात मसाजसाठी नागालँडसारख्या राज्यांतून आणलेल्या तरुणींची पडताळणी कोणत्या एजन्सीद्वारे झाली? त्या कायदेशीररीत्या काम करतात का? यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित हॉटेल्समध्ये मसाजच्या नावाखाली अन्य अवैध व्यवसाय सुरू नाहीत ना? याची चौकशी प्रशासनाने करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
दापोली पोलिस स्थानकात ‘मैत्री अॅप’च्या माध्यमातून काही नागालँड आणि नेपाळी तरुणींची नोंद झाल्याचे समजते. तालुक्यात शेकडो परराज्यातील तरुण-तरुणी कामानिमित्त अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत; मात्र त्यांच्या उपस्थितीची ठळक नोंद अनेकदा दिसून येत नाही.