

गुहागर : गुहागर-खालचापाट येथील सचिन बामणे व संतोष बामणे यांच्या घराला मंगळवारी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण घर भस्मसात झाले असून सुमारे १३ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
मंगळवारी (दि. ८) कानडे यांच्या घराबाहेर वेदांग कनगुटकर, विराज शिंदे, शुभम शिंदे, धनराज ओक, स्वानंद दिक्षित, आर्य खोत हे सहा तरुण गप्पा मारत बसले होते. मध्यरात्री १.३० च्या सुमारास सचिन बामणे यांच्या घराच्या माळ्यावर त्यांना उजेड दिसला. हा उजेड लाईटचा नाही, असे लक्षात आल्यावर तरुणांनी बारकाईने पाहिले. तोपर्यंत माळ्यावरील आगीने भीषण स्वरुप घेतले होते. त्यांच्यासमोरच पहिल्या मजल्यावरील खिडकीच्या काचाही फुटल्या. आग भीषण असल्याचे लक्षात येताच तरुणांनी याच घराच्या मागे राहणार्या संतोष बामणे यांचा मुलगा धीरजला फोन करुन उठवले. त्यानंतर धीरजला सोबत घेवून सचिन बामणे यांच्या घरातील सर्वांना उठवून घराबाहेर काढले. सचिन बामणे यांच्या घरात दोन वयोवृध्द व्यक्ती आहेत. या दोन वृद्धांना बाहेर काढण्यास मदत केली. अन्य ग्रामस्थांनाही कळवले. तरुणांच्या या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला
घटनेची माहिती मिळताच आरजीपीपीएल व कोकण एलएनजीच्या अग्निशमन दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थ व अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनी सुमारे २ तास अथक प्रयत्न करून आग पूर्णपणे आटोक्यात आणली. या मदतकार्यात नगरसेवक राजेंद्र भागडे यांनी पाणीपुरवठा करून सहकार्य केले. गुहागर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा नीता मालप, मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, न.पं. कर्मचारी तसेच सीआयएसएफचे जवान यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्याची पाहणी केली.