

रत्नागिरी ः आर्थिक व्यवहारातून वाद झाल्यामुळे पावस येथील आंबा व्यावसायिकाला शिवीगाळ व दमदाटी केली. याप्रकरणी अहमदनगर येथील चार जणांविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 27 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 1.30 वा. सुमारास घडली असून चार महिन्यांनंतर फिर्यादीने याबाबत तक्रार दिल्यानंतर शुक्रवार 17 जानेवारी रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुषार प्रदीपकुमार कुकरेजा, मिलन कांकारिया, पिंटू बोरा आणि एक अज्ञात (सर्व रा. अहिल्यानगर, अहमदनगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात अभिषेक सुहास शिंदे (मावळंगे थुळवाडी,रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, फिर्यादी आणि तुषार कुकरेजा यांच्यात आंबा व्यवसायातून ओळख झाली होती. त्यानंतर सन 2024 मध्ये त्यांच्यात आर्थिक व्यवहारातून वाद सुरू झाले.
या वादाच्या रागातून तुषार कुकरेजा आपल्या कारमधून सोबत अन्य चार संशयितांना घेउन 27 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी फिर्यादीच्या पावस येथील ऑफीसमध्ये आला. संशयितांमधील मिलन कांकारिया आणि पिंटू बोरा यांनी फिर्यादीला आपण पोलिस असल्याची बतावणी करुन करुन खंडणी स्वरुपात पैशाची मागणी केली मालमत्तेचे नुकसान करण्याची भीती दाखवली. तसेच सर्व संशयितांनी संगनमताने फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी केली. या प्रकरणी संशयितांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 204,308 (3),352,351, (2) (3), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.