रत्नागिरी : साधारणपणे पावसाळ्यात आंबा कलमांना पालवी येते, ऑक्टोबरमध्ये तर तापमानवाढीमुळे कलमांना उष्ण हवमानाची अनुकूलता प्राप्त होते. नंतर नोव्हेंबरमध्ये थंडी सुरू होताच आंब्यावर मोहर प्रक्रिया सुरू होते; मात्र या वर्षी पाऊस लांबला असल्यामुळे अद्यापही ऑक्टोबर हिट जाणवलीच नाही. त्यामुळे या वर्षी आंबा हंगाम लांबण्याची शक्यता बागायतदारांतून व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या ऑक्टोबरमध्ये अवकाळी पावसाचा मुक्काम लांबला आहे. त्यामुळे गुलाबी थंडीसाठी अद्याप प्रतीक्षाच करावी लागणार असली तरी ऑक्टोबर हिट गायब झाल्याने कलमे मोहरण्यासही उशीर होणार आहे. ऑक्टोबर महिना संपत आला तरी अद्याप पाऊस सुरूच आहे. त्यामुळे ऑक्टोबर हिटचा प्रभाव या वर्षी जाणवलाच नाही. शिवाय थंडीचीही चाहूल लागलेली नाही. पाऊस थांबल्यावर उकाडा जाणवतो. दररोज दुपारनंतर ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे हुडहुडणाऱ्या थंडीच्या प्रतीक्षेत ऑक्टोबर महिनाही सरत चालला आहे.
ऑक्टोबर महिन्यात अद्यापही पाऊस सुरू आहे. त्यामुळे गुलाबी थंडीसाठी अद्याप पोषक वातावरण नाही. वातावरणातील बदलामुळे थंडीचे आगमन उशिरा होणार, असे सांगण्यात येत आहे. जून ते सप्टेंबर पाऊस पडल्यानंतर ऑक्टोबरमध्ये कडकडीत ऊन पडते. उकाड्यामुळे अंगातून घामाच्या धारा लागतात. पहाटे धुके पडते. परंतु, सध्या सुरू असलेल्या पावसामुळे हवेत गारवा आहे. त्यामध्ये सासत्य नसल्याने आता थंडीची प्रतीक्षा दिवाळीपर्यंत करावी लागणार आहे.