

कणकवली : मालवण-राजकोट येथे साकारण्यात येणार्या भव्य शिवसृष्टीच्या सुमारे 83.45 कोटी रुपयांच्या आराखड्यातील आर्थिक तरतुदीला उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत बुधवारी तत्त्वतः मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतील शिवसृष्टीच्या उभारणीचा मार्ग अधिक प्रशस्त झाला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण-राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्यामुळे मालवणच्या पर्यटनाला मोठी चालना मिळाली आहे. देश-विदेशातील पर्यटक या स्थळाला भेट देत असल्याने, पुतळ्याच्या आजूबाजूचा परिसर सुशोभित करून तेथे शिवसृष्टी उभारण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे विशेष आग्रही होते व सातत्याने पाठपुरावा करत होते. बुधवारी झालेल्या बैठकीत शिवसृष्टीच्या संभाव्य आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आराखड्याची पाहणी करून काही सूचना केल्या. शिवसृष्टीची उभारणी करताना तेथील वार्याच्या वेगाचा आणि सागरी वातावरणाचा विचार करून टिकाऊ व दर्जेदार निर्मिती करावी, असे महत्त्वपूर्ण निर्देश ना. पवार यांनी दिले.
या शिवसृष्टीसाठी अंदाजे 83 कोटी 45 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, या आराखड्याच्या आर्थिक तरतुदीला बैठकीत मान्यता देण्यात आली. ही शिवसृष्टी लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी आग्रही भूमिका मांडली. या प्रकल्पामुळे मालवणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार असून, पर्यटनाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.