Marathi Language Museum| रत्नागिरीत उभारणार राज्यातील पहिले मराठी भाषा संग्रहालय

मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा : २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर; १ एकर जागा निश्चित
Uday Samant
Uday Samant
Published on
Updated on

रत्नागिरी : महाराष्ट्रातील पहिले भव्य आणि आधुनिक मराठी भाषा संग्रहालय रत्नागिरीमध्ये उभारले जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली. मराठीतील लेखकांवर याठिकाणी रिसर्च व्‍हावा, हा यातील महत्त्वाचा उद्देश आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी शहरात १ एकर जागा निश्चित करण्यात आली असून, तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

रत्नागिरीतील सन्मित्र नगर या मध्यवर्ती ठिकाणी हे मराठी भाषा संग्रहालय उभारले जाणार आहे. मराठी भाषेचा इतिहास, समृद्धी आणि तिचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने हे संग्रहालय राज्यातील पहिलेच मानबिंदू ठरेल. या संग्रहालयाच्या माध्यमातून मराठी भाषेच्या विविध बोलीभाषांवर सखोल संशोधन केले जाणार असून, ज्या महनीय व्यक्तींनी आणि साहित्यिकांनी मराठीसाठी मोलाचे योगदान दिले, त्यांच्या साहित्यावर संशोधन व संग्रह केला जाईल.

दरम्यान, रत्नागिरीतील ऐतिहासिक थिबा पॅलेस परिसरात व साने गुरुजींचे गाव असलेल्या पालगड गावात 'पुस्तकांचे गाव' विकसित केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. संत ज्ञानेश्‍वर लिखित ज्ञानेश्‍वरीपासून मराठीत साहित्‍य उपलब्‍ध आहे. सातशे वर्षांपूर्वीपासूनचे मराठी भाषेतील लेखक व त्‍यांच्‍या साहित्‍यावर या ठिकाणी अभ्‍यास केला जाईल. बोली भाषांवरही याठिकाणी अभ्‍यास होईल, असे ना. सामंत यांनी सांगितले.

रत्‍नागिरीतील बीएड कॉलेज परिसरात छत्रपती शिवाजी महाराज ग्रंथालय उभारले जात असून, याजवळच हे मराठी भाषा संग्रहालय उभारले जाणार आहे. याठिकाणी एक एकर जागा उपलब्‍ध करून देण्‍यात येणार आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांनी येऊन पीएचडी करावी, अभ्‍यास करावा हा हेतू आहे.

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, साने गुरुजी, कवी केशवसुत, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, लोकमान्य टिळक आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कविवर्य मंगेश पाडगावकर, मधु मंगेश कर्णिक, अशा महनीय व्यक्तिमत्त्वांचा ऐतिहासिक व साहित्यिक वारसा रत्नागिरीच्या भूमीला लाभला आहे. याच समृद्ध सांस्कृतिक मांदियाळीमुळेच महाराष्ट्रातील हे पहिले भाषा संग्रहालय रत्नागिरीत उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news