

रत्नागिरी: उन्हाळी सुट्टी असल्यामुळे शाळा-महाविद्यालये बंद आहेत. दरम्यान, येत्या 16 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे एस.टी. महामंडळाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयातच एसटीचे पासेस देण्यात येणार आहे. त्याचे नियोजन सुरू आहे. ज्या शाळांनी मागणी केल्यास त्यांनाही अर्ज, पासेस देण्यात येणार आहे. पासमध्ये मुलींना 100 टक्के तर मुलांना 66 टक्के सवलत मिळणार आहे.
शाळा-महाविद्यालयांत जाण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील दररोज हजारो, लाखो विद्यार्थी एसटी बसेसमधून प्रवास करत असतात. त्यामुळे एसटीला चांगले उत्पन्न ही मिळते. ज्येष्ठ नागरिकांना मोफत, महिलांना 50 टक्के सवलत आहे. तसेच दररोजचा प्रवास करणार्या शाळा-महाविद्यालयातील मुला-मुलींना पासमध्ये विशेष सवलत देण्यात येते.
दरम्यान, आता एसटी महामंडळाच्या बसेसमुळे ग्रामीण भागातील शाळेत जाणार्या विद्यार्थ्यांना विविध सवलतीचे पास दिले जातात. आता या पासेससाठी एसटी महामंडळात जायची गरज राहणार नाही. आता थेट शाळेतच विद्यार्थ्यांना पासेस देण्याची सोय करण्यात आली आहे.
शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेणार्या मुला-मुलींना पासेससाठी त्या बोनाफाईड व एक छायाचित्र द्यावे लागणार आहे. तसेच मुख्याध्यापक किंवा प्रचार्यांना त्यांच्या विद्यार्थी-विद्यार्थिंनीना मोफत बस पास द्यायचे असल्याचे तसे पत्र आगार प्रमुखांना द्यावे लागणार आहे.मागणी केल्यास अर्ज, पासेस एसटी विभागाकडून दिले जाते.
शहर, जिल्ह्यात इतक्या आहेत शाळा, महाविद्यालये
ग्रामीणमध्ये जि.प. प्राथमिक शाळा-2400
जि.प. माध्यमिक शाळा-387
रत्नागिरी शहरात शाळा- 21
एकूण जिल्ह्यात महाविद्यालये-156
घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून 66 टक्के इतकी सवलत दिली आहे. म्हणजे केवळ 33 टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे शासनाच्या अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणार्या सर्व विद्यार्थिंनींना मोफत एसटीचे पासचे वितरण केले जाते. एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा न राहता आता शाळा, महाविद्यालयातच पासेस मिळणार आहेत.
शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एक महिना, त्रैमासिकसह विविध सवलतीत पास देण्यात येतो. एसटी विभागाचे काही कर्मचारी शाळेत जाऊन याची माहिती देतात. ज्या शाळा, महाविद्यालयांनी पासेससाठी मागणी केली आहे. त्यांना अर्ज, पासेस दिले जाते. 16 जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. त्यासाठी पासेस देण्यास सुरुवात झाली आहे. ज्या शाळा-महाविद्यालयांना पासेस हवे असल्यास त्यांनी मागणी करावी.
बाळासाहेब आडसुळे, आगार व्यवस्थापक, रत्नागिरी