Child School Admission : पहिलीचा प्रवेश सहा वर्षांनंतरच

बालकांच्या बौद्धिक व शारीरिक विकासाचा विचार करून सर्वच शाळांना अट बंधनकारक
Child School Admission
पहिलीचा प्रवेश सहा वर्षांनंतरचPudhari File Photo
Published on
Updated on

रत्नागिरी :शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता पहिलीच्या प्रवेश प्रक्रियेत यंदा कडक वयोमर्यादा लागू करण्यात आली आहे. 31 डिसेंबर 2026 रोजी वयाची 6 वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच पहिलीत प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. यामध्ये एक-दोन महिन्यांची कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

अनेक वेळा पालक घाईघाईत प्रवेश अर्ज भरताना जन्मतारीख नीट तपासत नाहीत. मात्र, यंदा जन्मनोंद प्रमाणपत्रावरील तारीख अंतिम मानली जाणार असून, त्यात कोणताही बदल अथवा शिथिलता दिली जाणार नाही. राज्य शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार बालकांच्या बौद्धिक व शारीरिक विकासाचा विचार करून ही अट बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे अंगणवाडीतून थेट पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या पालकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. शिक्षण विभागाने सर्व शाळांना याबाबत स्पष्ट सूचना दिल्या असून, प्रवेश प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियमांनुसार पात्र नसलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास संबंधित शाळेवर कारवाई होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. पालकांनी आपल्या पाल्याची जन्मतारीख, आवश्यक कागदपत्रे आणि वयोमर्यादा तपासूनच प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

शाळांमध्ये अपेक्षित पटसंख्या लक्षात घेऊन वर्गखोल्या, शिक्षक उपलब्धता आणि पायाभूत सुविधांचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन प्रवेश क्षमता निश्चित करण्याबाबत शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. पहिलीच्या प्रवेशाबाबतचे वयोमर्यादेचे नियम सर्व सरकारी, अनुदानित व खासगी शाळांसाठी समानपणे लागू करण्यात आले असून, संबंधितांना स्पष्ट निर्देश जारी करण्यात आले आहेत. प्रवेश प्रक्रिया काटेकोरपणे राबवून जन्मतारीख पडताळणी अनिवार्य ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

नवीन वयोमर्यादा निकषांमुळे लहान मुलांना घाईघाईने शालेय शिक्षणात ढकलले जाणार नाही, त्यामुळे त्यांना बालपणाचा आनंद घेता येणार आहे. खेळ, अंगणवाडीतील उपक्रम आणि सर्वांगीण विकासासाठी आवश्यक वेळ मिळाल्याने त्यांच्या मानसिक व बौद्धिक वाढीसही सकारात्मक आधार मिळणार आहे. इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी जन्मनोंद प्रमाणपत्र, आधारकार्ड (असल्यास), रहिवासी दाखला व अंगणवाडी पूर्णता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच पालकांचा ओळखपत्र व पासपोर्ट आकाराचे छायाचित्र जोडणे बंधनकारक असून सर्व कागदपत्रांची पडताळणी करूनच प्रवेश निश्चित केला जाणार आहे.

नवीन शैक्षणिक धोरण होणार लागू

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आलेले राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 टप्प्याटप्प्याने लागू होत असून अभ्यासक्रम, मूल्यांकन पद्धती आणि शैक्षणिक रचनेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news