

जान्हवी पाटील, रत्नागिरी
तब्बल 35 वर्षे एकाच पक्षात प्रामाणिक राहून काम केल्यानंतर विधानसभा निवडणुकीत आपल्याच पक्षातील नेत्यांनी विरोधात काम केले त्यामुळे पराभव झाला. अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. निष्ठेचे फळ तर मिळालेच नाही, जिल्ह्याचे काम करायचे असेल, तर सत्तेत असलेल्या पक्षासोबत जाणे गरजेचे होते, असे सांगत माजी आमदार, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कट्टर शिवसैनिक राजन साळवी यांनी बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश करून ‘धनुष्यबाण’ हाती घेतले.
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतरही राजन साळवी यांनी सलग तीन वर्षे उद्धव ठाकरे यांच्या प्रती असणारी आपली निष्ठा कायम ठेवली. विशेष म्हणजे दरम्यानच्या काळात त्यांना अनेक कारवायांना सामोरे जावे लागले.? विविध तपास यंत्रणांच्या चौकशीला सामोरे जावे लागत. ते तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. नुकतीच विधानसभा निवडणूकही त्यांनी लढवली होती; पण त्यांचा पराभव झाला. ते म्हणाले, हा पराभव आपल्याच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकार्यांमुळे झाला. माजी खासदार विनायक राऊत यांनी निवडणुकीत आपल्या विरोधात काम केले. बाळासाहेबांचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून राजन साळवी यांनी शिवसेनेत आपले स्थान भक्कम केले होते. मात्र, विधानसभेला झालेल्या पराभवानंतर राजन साळवी हे प्रचंड नाराज होते. कोकणात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील बहुतांश शिवसैनिकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे या ठिकाणी आता शिंदेसेनेचे वर्चस्व वाढले आहे.
शिंदे सेनेचे वर्चस्व वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय मंत्री उदय सामंत व त्यांचे मोठे बंधू किरण ऊर्फ भैया सामंत यांनी प्रयत्न केले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात शिंदेसेनेचे 3 आमदार निवडून आले, तर उद्धव सेनेची गुहागरमधील एकच जागा निवडून आली. कोकणात उद्धव सेनेचे वर्चस्व फार राहिलेले नाही. परिणामी, नाराज असलेले पदाधिकारी आता शिंदेसेनेत प्रवेश करू लागले आहेत.
राजन साळवी हे उद्धव सेनेतील विश्वासू नेते म्हणून ओळखले जात होते. साळवी यांनी पक्षासाठी एकनिष्ठपणा दिला, त्याबदल्यात आपल्याला केवळ त्रास झाला. आता शिंदेसेनेत काम करायचे आहे. त्यामुळे त्यांनी ‘धनुष्यबाण’ हाती घेतले. तत्पूर्वी ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही होत्या; मात्र अपेक्षित बोलणी न झाल्याने शेवटी राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपली खदखद व्यक्त केली. त्यांना विधान परिषदेची आमदारकी आणि महामंडळ मिळणार असल्याने त्यांनी पक्षप्रवेशासाठी संमती दर्शवल्याची चर्चा आहे. आता शिंदेसेनेचे रत्नागिरी जिल्ह्यात वजन आणखीन वाढणार आहे. पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांनी राजन साळवी यांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी काम करणार असल्याचे म्हटले आहे. राजन साळवी यांचे शिंदेसेनेत येण्याने काही शिवसैनिक नाराज आहेत. मात्र, स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजन साळवी यांना पक्षात घेण्याचा निर्णय घेतल्याने याचे काही लोकांनी स्वागतही केले आहे.
राजन साळवी यांनी नगरसेवक पदापासून आमदारकीपर्यंतची सुमारे 35 वर्षांची कारकीर्द शिवसेनेत काढली. 3 वेळा आमदार असूनही त्यांना अपेक्षित पद मिळाले नव्हते. 2024 च्या निवडणुकीतील पराभव त्यांच्या पचनी पडला नाही.? एकंदरीत राजन साळवी यांच्या नाराजीचे रूपांतर पक्षांतर करण्यात झाले. राजन साळवी यांनी थेट माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर निशाणा साधला आणि माझ्या पराभवाला ते जबाबदार असल्याचेही सांगितले. याविषयी सांगण्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली. त्यातून काहीही साध्य झाले नाही. अखेर त्यांनी धनुष्यबाण हाती घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता राजन साळवी यांना विधान परिषदेबरोबरच कोणते महामंडळ किंवा अन्य पद देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.