Jaitapur Project : महायुतीत जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावरून धुसफूस?

आमदार प्रमोद जठारांच्या समर्थनाच्या भूमिकेने रत्नागिरीत राजकीय चर्चा; शिवसेनेची भूमिका काय राहणार याकडे लक्ष
MLA Pramod Jathar
आमदार प्रमोद जठार
Published on
Updated on

रत्नागिरी : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुद्द्यावरून रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भाजपचे आमदार प्रमोद जठार यांनी ‘जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प झालाच पाहिजे’ अशी भूमिका जाहीरपणे मांडल्यानंतर महायुतीतील घटक पक्षांमध्ये मतभिन्नता समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जैतापूर प्रकल्प हा कोकणातील सर्वाधिक चर्चेचा आणि वादग्रस्त विषय राहिला आहे. स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी आणि विविध संघटनांनी या प्रकल्पाला सातत्याने विरोध दर्शविला असून, यापूर्वी झालेल्या आंदोलनांमुळे हा मुद्दा राज्यभर गाजला होता. अशा परिस्थितीत आमदार जठार यांनी रोजगारनिर्मिती आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने प्रकल्पाचे समर्थन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

दुसरीकडे, शिवसेनेची भूमिका सुरुवातीपासूनच स्थानिक जनभावनांच्या बाजूने राहिली आहे. लांजा-राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी विविध विकास प्रकल्पांबाबत स्थानिकांच्या मतांचा आदर करण्याची भूमिका घेतली असून, अलीकडेच बॉक्साईट प्रकल्पाविरोधातही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली होती. त्यामुळे जैतापूर प्रकल्पाबाबत शिवसेना कोणती अधिकृत भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

जठार यांच्या विधानानंतर अद्याप शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी राजकीय स्तरावर चर्चा रंगू लागल्या आहेत. आगामी काळात जैतापूर प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय केंद्रस्थानी येण्याची शक्यता व्यक्त होत असून, महायुतीतील समन्वयाचीही कसोटी लागणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news