

खेड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून सध्या त्यासंदर्भात कोणतीही प्रक्रिया सुरू नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. खेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडताना केंद्र शासनाच्या 'अमृत २.०' अभियानांतर्गत मंडणगड नगरपंचायतीसाठी ४२ कोटी रुपयांच्या नळपाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळाल्याची माहिती दिली.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तटकरे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या विषयावर चर्चा सुरू होती. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनंतर काही निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, सध्याच्या परिस्थितीत त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, विलीनीकरणाबाबत कोणतीही प्रक्रिया सुरू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंडणगड नगरपंचायतीसाठी मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेबाबत बोलताना तटकरे म्हणाले, केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार छोट्या नगरपंचायतींनाही प्राधान्य देत विकासकामांना गती देत आहे. त्याचाच भाग म्हणून 'अमृत २.०' योजनेतून मंडणगडसाठी ४२ कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेस मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेमुळे भविष्यात शहरातील नागरिकांना नियमित आणि शुद्ध पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले. त्या बैठकीत आपण, जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होतो. मात्र, ती भेट पूर्णपणे योगायोगाने झाली असून त्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झालेली नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे या भेटीवरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना त्यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.