

रत्नागिरी: नमन खेळे, जाखडी, वहीगायन आणि झाडीपट्टी या लोककला प्रकारांचा समावेश लोककला अनुदान योजनेत करण्यात आला. त्याचप्रमाणे येत्या महिन्याभरात भजन कलेचाही लोककला अनुदान योजनेत समावेश करणार असल्याची ग्वाही राज्याची माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिककार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी रत्नागिरीत केली. तसेच येत्या काळात कोकणात मराठी सिनेमा महोत्सव आयोजित करणार असल्याची घोषणाही शेलार यांनी केली.
महाराष्ट्राच्या समृद्ध लोक सांस्कृतिक वारशाचे जतन संवर्धन व प्रचारासाठी नमन, खेळे, जाखडी, वहीगायन आणि झाडीपट्टी या लोककला प्रकारांचा समावेश लोककला अनुदान योजनेत केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करण्यासाठी नमन लोककला रत्नागिरी जिल्हा मातृसंस्था तसेच विविध संघटनेच्या वतीने कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेलार बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री उदय सामंत, लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत, आमदार प्रमोद जठार, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, शिंदे सेना संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, अभिनेता सुशांत शेलार आदी उपस्थित होते. कोकणी लोककला पाहून शेलार भारावून गेले. लोककलांना राजाश्रय देण्याचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही आहे. कोकणी लोककलेला दर्जा देण्याची संकल्पना व पाठपुरावा उदय सामंत यांनी केला होता, असेही मंत्री शेलार यांनी सांगितले.