‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे घंटानाद आंदोलन

देवरहाटीच्या जमिनी देवस्थानाच्या नावे करण्याविषयी अधिवेशनात सकारात्मक पाऊल उचलण्याची मागणी
Maharashtra Mandir Mahasangh protest
रत्नागिरी ः जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करताना महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि विविध देवस्थानचे पदाधिकारी.pudhari photo
Published on
Updated on

रत्नागिरी ः देवरहाटी / देवराई हा ग्रामस्थांच्या श्रद्धेचा आणि धार्मिक परंपरेचा विषय आहे. असे असूनही महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 मधील प्रावधानाचा भंग करून, तसेच मंदिरे धर्मादाय आयुक्तांकडे रजिस्टर नसल्याचे कारण देत देवस्थानच्या देवरहाटीवरील देवस्थानचे नाव बेकायदेशीरपणे कमी करत ‘महाराष्ट्र शासन’ अशी नोंद केली. याद्वारे शासनाने हिंदूंच्या धार्मिक आणि सांस्कृतिक हक्कांचे उल्लंघन केले आहे. तालुक्यातील जयस्तंभ येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र मंदिर महासंघाच्यावतीने झालेल्या आंदोलनाद्वारे शासनाने हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांचा अनादर केल्याने निषेध नोंदवण्यात आला. यावेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य समन्वयक संजय जोशी यांनी मार्गदर्शन केेले.

महाराष्ट्र शासनाने चालू अधिवेशनात ‘देवरहाटीच्या जमिनीवरील शासनाचा हक्क कमी करून त्या पुन्हा देवस्थानाच्या नावे करण्याचा निर्णय घ्यावा’, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर हे आंदोलन संपूर्ण जिल्ह्यात अधिक तीव्र करण्याची चेतावणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने शासन आणि प्रशासनाला दिली आहे. या आंदोलनाला रत्नागिरी तालुक्यासह इतर तालुक्यातील मंदिर विश्वस्तांचा चांगला प्रतिसाद होता.

आंदोलनानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नावे असलेले निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना देण्यात आले. यावेळी संगमेश्वर येथील श्रीदेव निळकंठेश्वर देवस्थानचे अध्यक्ष जयंत आठल्ये, सचिव चैतन्य सरदेशपांडे, लांजा येथील श्री जुगाई पौलस्तेश्वर मंदिराचे विश्वस्त मुकुंद गांधी, संतोष लिंगायत, कारवली येथील श्री काळंबादेवीचे अरविंद वरेकर, शिवचरित्र कथाकार अरविंद बारस्कर, नेवरे येथील श्रीदेव विश्वेश्वरचे अध्यक्ष मुकुंद परांजपे, पाली येथील प.वि.सावंत, मुरुगवाडा येथील श्री भैरी देवस्थानचे विश्वस्त विजय पिलणकर, राजापूर धोपेश्वर देवस्थानचे प्रकाश कांबळे, गोठणे दोनिवडेचे सुधीर विचारे, शीळ येथील गोपाळ गोंडाळ, न्यू हनुमान मंदिर, खडपेवाडी-राजापूरचे अध्यक्ष मनिष शिंदे, आंबेवाडी ग्रामस्थ विकास मंडळ राजापूरचे अध्यक्ष प्रकाश लोळगे, श्री विठ्ठल राम पंचायतन मंदिर राजापूरचे विजय हिवाळकर, वाटद-खंडाळा येथील प्राजक्ता जंगम यांच्यासह 100 हून अधिक विश्वस्त, नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही जमिनीवरील मालकी हक्क सिद्ध करण्याचे सक्षम प्राधीकरण हे दिवाणी न्यायालय असतांना महसूल विभागाद्वारे देवराई/देवरहाटी जमिनीचा मालकी हक्क पालटणे, ही बेकायदेशीर, अवैध गोष्ट ठरते. शासनाने हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आदर करून नोंदी देवस्थानच्या नावे पूर्ववत कराव्यात.

गोविंद भारद्वाज, हिंदु जनजागृती समिती

शासनाने देवस्थानची देवरहाटीवरील नावे कमी केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. मंदिर विश्वस्त आता मंदिरांच्या हक्कांसाठी मंदिर महासंघाच्या माध्यमातून जागृत आणि संघटित होत आहेत. देवरहाटीच्या मागणीला यश मिळेपर्यंत हा लढा सुरू ठेवू.

सुरेश शिंदे, महाराष्ट्र मंदिर महासंघ, जिल्हा संघटक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news