

रत्नागिरी : दोन लाखांपर्यंतच्या शेती किंवा पीक कर्जासाठी लागणारे मुद्रांक शुल्क महाराष्ट्र शासनाने माफ केले आहेत. त्यामुळे कर्ज प्रक्रियेतील कागदावरील खर्च वाचणार असून नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच हा निर्णय लागू करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घेणे सुलभ होणार असून त्यांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाची नव्या वर्षापासून अंमलबजावणीस प्रारंभ करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना पूर्वी पीक कर्ज घेताना गहाणखत, करारपत्र किंवा हमीपत्र तयार करण्यासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागत होते. प्रत्येक एक लाखासाठी 300 रुपये स्टॅम्प ड्युटी भरावी लागत होती. दोन लाखांच्या कर्जावर 600 रुपये खर्च करावे लागत होते. मात्र 1 जानेवारी 2026 पासून मुद्रांक शुल्क रद्दचा नवीन नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे दोन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी आता एक रूपयाही स्टॅम्प ड्युटी द्यावी लागणार नाही. स्टॅम्प ड्युटी माफ झाल्यामुळे कागदोपत्री प्रक्रिया सुलभ झाली आहे. शिवाय शेतकऱ्यांची आर्थिक बचतही होणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांतून आनंद करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांचा खर्च वाचणार
पूर्वी एक लाख रुपये पीक कर्जासाठी 300 रुपये स्टॅम्प ड्युटीसाठी खर्च होत होते. मात्र मुद्रांक शुल्कच माफ करून कर्ज प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. सरकारी, खासगी बँका, विविध विकास सोसायटींसाठी हा नियम बंधनकारक केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.