

समीर जाधव
चिपळूण : कोयना वीज प्रकल्पातून सोडण्यात येणारे अवजल मुंबईला वळवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, हा निर्णय चिपळूणसह कोकणसाठी अडचणीचा ठरणार आहे. गेली अनेक वर्षे कोयनेचे पाणी कोकणामध्ये खेळवावे, यासाठी मागणी होत होती. माजी मंत्री रामदास कदम यांनी हे पाणी कोकणातच कशा पद्धतीने सिंचनासाठी वापरता येईल, यासाठी सर्वेक्षण केले होते. त्याच पद्धतीने कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनीही या विषयावर अभ्यास केला होता आणि कोयनेचे अवजल रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रायगड जिल्ह्यांत कशा पद्धतीने सिंचनासाठी वापरता येईल, यावर प्रस्ताव दिला होता.
शासनाने अनेक समित्या स्थापन करून कोयनेच्या पाण्याच्या अवजलाचा वापर कशा पद्धतीने करता येईल, याचे अहवाल करून घेतले होते. मात्र, अनेक वर्षे हे अहवाल लालफितीत अडकले होते आणि दुष्काळाच्या काळात हा निर्णय घेतल्याने कोकणसाठी हा निर्णय धोक्याचा ठरणार आहे. मुंबईला पाणी नेताना रत्नागिरी-सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांचा विचार झाला, तर त्याचा अधिक फायदा होणार आहे.
कोयना अवजलाच्या वापराबाबत शासनाकडे ४ ते ५ अहवाल देण्यात आले होते. यामध्ये पाणी मुंबईला द्यावे, विदर्भ-मराठवाड्याकडे वळवावे किंवा कोकणात हे पाणी खेळवून सिंचन क्षेत्र वाढवावे, असे अनेक अहवाल मांडण्यात आले होते. त्या दृष्टीने अभ्यासही करण्यात आला होता. मात्र, आजपर्यंत या अहवालावर एकदाही शासनाने विचार केला नव्हता. आज शासनाने कोयनेचे अवजल मुंबईला देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. वाशिष्ठीचे अस्तित्वच धोक्यात येणार आहे. वाशिष्ठीची जैवविविधता यामुळे धोक्यात येईल की काय, अशी शंका उपस्थित होत आहे.
कोयनेचे पाणी थेट मुंबईला वळवले, तर वाशिष्ठीची जैवविविधता धोक्यात येण्याची शक्यता आहे. हे पाणी कालव्याद्वारे वाशिष्ठी नदीला सोडण्यात येते. वर्षभरात ६७ टीएमसी पाणी व वाशिष्ठी नदीतून समुद्राला जाऊन मिळते, हे खरे असले तरी या वाशिष्ठी नदीवर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. जर यातील बहुतांश पाणी मुंबईला गेले तर मोठी अडचण निर्माण होणार असून, स्थानिकांकडून आंदोलन उभे राहील, अशी शक्यता व्यक्त होत आहे .
कोयना अवजलावर येथील लोटे एमआयडीसी, गाणेखडपोली एमआयडीसी, खेर्डी एमआयडीसी तसेच गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील आरजीपीपीएल विद्युत प्रकल्प, कोकण रेल्वे याच पाण्यावर अवलंबून असते. याशिवाय, चिपळूण, खेर्डी, शिरगाव, अलोरे, पोफळी तसेच मिरजोळी व अन्य गावांच्या पाणीपुरवठा योजना याच पाण्यावर अवलंबून आहेत. येथे स्थानिक जलस्रोत नसल्याने सुमारे ६० वर्षे हा भाग कोयना वीज प्रकल्पाच्या अवजलावर अवलंबून आहे. अनेक गावचा नळपाणीपुरवठा योजना हेच पाणी उचलत आहेत. यावर मोठा परिणाम होणार आहे.