Language Compulsion : आता नववी, दहावीच्‍या विद्यार्थ्यांना तीन भाषा अनिवार्य

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा निर्णय; नवीन नियम येत्‍या १ जुलैपासून लागू होणार
Language Compulsion
आता नववी, दहावीच्‍या विद्यार्थ्यांना तीन भाषा अनिवार्य
Published on
Updated on

रत्नागिरी : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडाअंतर्गत बोर्डाने भाषा शिक्षणाच्या नियमांत मोठा बदल केला आहे. या नव्या नियमांनुसार, आता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकणे अनिवार्य असणार आहे. विशेष म्हणजे, या तीन भाषांपैकी किमान दोन भाषा या भारतीय वंशाच्या असणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा नवा नियम येत्या १ जुलैपासून लागू केला जाणार आहे.

दरम्‍यान, सीबीएसईने या संदर्भात १५ मे रोजीच देशातील सर्व शाळांना अधिकृत परिपत्रक पाठवून याची सविस्तर माहिती दिली आहे. यापूर्वी सीबीएसई बोर्डाने एप्रिल महिन्यापासूनच सहावीच्या वर्गांसाठी हे त्रिभाषा सूत्र लागू केले होते. आता हाच नियम नववी व दहावीच्या वर्गांसाठीही बंधनकारक करण्यात आला आहे.

नवीन नियमांमुळे परदेशी भाषा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. जर एखाद्या विद्यार्थ्याला एखादी परदेशी भाषा शिकायची असेल तर तो ती केवळ 'तिसरी भाषा' म्हणूनच निवडू शकतो. परंतु ही निवड करताना त्याच्या पहिल्या दोन भाषा या भारतीय असणे आवश्यक आहे. जर त्याच्या पहिल्या दोन भाषा भारतीय नसतील तर त्या परदेशी भाषेला तिसरी भाषा न मानता चौथी अतिरिक्त भाषा म्हणून गृहीत धरले जाईल आणि त्याचा अभ्यास करावा लागेल. या संपूर्ण प्रक्रियेत भाषा शिक्षण हे 'एनसीईआरटी'च्या नवीन अभ्यासक्रमानुसारच दिले जाईल, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे. सध्या इयत्ता नववीसाठी त्रिभाषेची स्वतंत्र पुस्तके उपलब्ध झालेली नाहीत. त्यामुळे जोपर्यंत ही नवीन पुस्तके उपलब्ध होत नाहीत. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी त्यांनी निवडलेल्या भाषेसाठी इयत्ता सहावीच्या पुस्तकाची

२०२६-२७ ची नवीन आवृत्ती वापरून आपला अभ्यास सुरू ठेवावा, अशा सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. सीबीएसईच्या या निर्णयामुळे आता शालेय स्तरावर भारतीय भाषांना अधिक महत्त्व मिळणार असून, विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेसोबतच इतर प्रांतीय भाषा शिकण्याचीही चांगली संधी उपलब्ध झालेली दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news