15 लाख कोटी गुंतवणुकीतून राज्याचा शाश्वत विकास : ना. सामंत

Pudhari Icon award : रत्नागिरी येथे दै. पुढारी आयकॉन पुरस्कार सोहळ्यात प्रतिपादन
Uday Samant statement
रत्नागिरी : दै. ‘पुढारी’ आयकॉन पुरस्कार वितरण सोहळ्यात दीपप्रज्वलन करताना राज्याचे उद्योगमंत्री व मराठी भाषा विभागाचे मंत्री डॉ. उदय सामंत, ‘पुढारी’चे कार्यकारी संपादक विजय जाधव, आवृत्तीप्रमुख जान्हवी पाटील, पुढारीचे इव्हेंट व्यवस्थापक राहुल शिंगणापूरकर. (छाया : संदेश पवार)
Published on
Updated on

रत्नागिरी : डावोसमध्ये राज्यात 15 लाख कोटींची गुंतवणूक होत असून यामुळे राज्याचा शाश्वत विकास होणार आहे. प्रशासनाने प्रकल्प येणार्‍या भागातील लोकांना प्रकल्पाचे महत्त्व समजावून सांगितल्यास उद्योग येतील आणि विकासाला चालना मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले.

रत्नागिरी येथे आयोजित ‘पुढारी’ आयकॉन पुरस्कार सोहळ्यात ना. सामंत यांनी आपले विचार व्यक्त केले. हॉटेल विवेकच्या देसाई बॅक्वेंट हॉलमध्ये हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना ना. उदय सामंत म्हणाले की, गडचिरोली हा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी एक लाख कोटींचा प्रकल्प आणला आहे. आता नक्षलग्रस्तांकडे वळणारे लोक बंदूका सोडून देत आहेत. याचे श्रेय तेथील पोलिसांना आहे.

रत्नागिरीतही 30 हजार कोटींचे प्रकल्प आणले आहेत. प्रकल्प येत असताना शेतकर्‍यांना अडचणी निर्माण होत असतात. त्याबद्दल माध्यमांनी वाचा फोडली पाहिजे. परंतु प्रसिद्धी माध्यमांनीही प्रकल्प समजून घेत, त्याबद्दल लोकांमध्ये जागृती करायला हवी, असे स्पष्ट मतही व्यक्त केले. डिफेन्स क्लस्टरच्या माध्यमातून रत्नागिरी धिरुभाई अंबानी डिफेन्स कंपनी उभारली जाणार आहे. याठिकाणी निर्माण होणारी शस्त्रास्त्र भविष्यात आपल्या सैनिकांच्या व सुरक्षा रक्षकांच्या हाती असणार आहेत. मात्र या प्रकल्पाविषयी स्थानिक शेतकर्‍यांच्या मनात वेगळेच भरवण्यात आले होते. या लोकांमध्ये जागृती केली पाहिजे.

रत्नागिरी शहराच्याजवळ चंपक मैदान येथे चारशे एकरवर 20 हजार कोटींचा व्हीआयटी सेमीकंडक्टरचा प्रकल्प येत आहे. यामुळे 20 हजारांहून अधिक रोजगार उपलब्ध होणार आहेत. कोकाकोलाचा प्रकल्प येत असून, त्यात सात हजार रोजगार निर्माण होणार असल्याचेही ना. सामंत यांनी सांगितले. चांगले प्रकल्प येत असतील तर त्यांचे समर्थन केले पाहिजे. नोकर्‍यांसाठी बाहेर जाणार्‍यांची संख्या दुप्पटीने वाढत आहे. त्यामुळे प्रकल्पांचे समर्थन झाल्यास ही संख्या कमी होईल, माध्यमांसह सर्वांनीच प्रकल्पांच्या समर्थनार्थ पुढे आले पाहिजे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

दिल्लीत जेएनयुमध्ये कुसुमाग्रज मराठी न्यास व छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास केंद्र उभारले जाणार आहे. मराठी भाषा हा विभाग वैश्विक आहे. 17 देशात मराठी भाषा बृहनमंडळे असून, 50 देशात ती निर्माण करण्यासाठी आपले प्रयत्न सुरु असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.

या कार्यक्रमात अधिकार्‍यांविषयी कौतुगोदगार काढताना ना. सामंत म्हणाले की चांगले काम झाले की, आमचे सत्कार होत असतात, मात्र त्यामागे ताकद शासनाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांची असते. या चांगले काम करणार्‍या अधिकार्‍यांचा सत्कार करण्याचे धाडस पुढारीने दाखवले आहे. एखादे काम न झाल्यास अधिकारी वर्ग हा सर्वांचेच सॉफ्ट टार्गेट असतो, मिडीयानेही चांगले काम करणार्‍या अधिकार्‍याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. शंभर टक्के अधिकारी चांगले काम करतात असेही नाही परंतु चांगले काम करणार्‍यांच्या पाठीशी राहण्याची भूमिका ‘पुढारी’ने घेतली. अधिकार्‍यांचा सकारात्मक विचार असेल तर जिल्ह्याचा विकास वेगाने होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अधिकार्‍यांचा सत्कार म्हणजे महाराष्ट्र शासनाचा सत्कार असून पुढारीने चांगल्या कामावर शिक्कामोर्तब केले आहे.

रत्नागिरीचे पालकमंत्रीपदी साडेतीन वर्ष असून, अधिकार्‍यांना आपल्याला सांगावे लागत नाही. एखादी घटना घडल्यास मी सांगण्याआधीच अधिकारी घटनास्थळी पोहचलेले असतात, अधिकार्‍यांनाही बंधने असतात, नियमात बसत असेल तर आपणही त्यांना पाठिंबा देतो, अ‍ॅरोगन्सी दाखवण्यापेक्षा अधिकार्‍यांनी चेहर्‍यावर हास्य आणून सांगितल्यास, समोरील व्यक्तीही नाराज न होता खूष होऊन जात असतो. प्रशासनाची ताकद पुढारीने ओळखली आहे. त्यामुळेच राजकारणी लोकांच्या सत्कारापेक्षा चांगले काम करणार्‍या अधिकार्‍यांसह अन्य सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍यांचा सत्कार पुढारीने करुन कोकणात प्रथमच वेगळा पायंडा पाडला आहे. पुढारी आयकॉन सारखा उपक्रम आयोजित करुन, पुरस्कारप्राप्त व्यक्तींंची उंची वाढली असल्याचे ना. सामंत यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाच्या प्रारंभ ना. उदय सामंत यांनी दीपप्रज्वलन करुन केला. यावेळी दै. पुढारीचे कार्यकारी संपादक विजय जाधव, रत्नागिरीच्या आवृत्तीप्रमुख जान्हवी पाटील, राहूल शिंगणापूरकर उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक जान्हवी पाटील यांनी केले. यावेळी कार्यकारी संपादक विजय जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. रत्नागिरीचे जाहीरात विभागप्रमुख संजय पंडीत यांनी आभार मानले. पूर्वा पेठे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

या कार्यक्रमात 18 कर्तुत्वान व्यक्ती आणि संस्थांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी रत्नागिरी, जिल्हा परिषद रत्नागिरी, रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर व सहकारी, स्थानिक गुन्हे अन्वेक्षण शाखा पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, जिल्हा शल्यचिकित्सक भास्कर जगताप, रत्नागिरी नगर परिषद मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, रत्नागिरी, न्याती ग्रुप, हॉटेल विवेक, रत्नागिरी, माजी जि.प. अध्यक्ष रोहन सुभाष बने, महिला उद्योजिका सौ. वैभवी प्रभात भालेकर, सामाजिक कार्यकर्त्या सौ. निलम आनंद पालव, अ‍ॅड. महेश गोपाळ नकाशे, एकनाथ शंकर विश्वासराव, चिपळूणचे सामाजिक कार्यकर्ते नाझिम अफवारे यांचा गौरव करण्यात आला.

चांगले काम करणार्‍यांच्या सत्काराचे ‘पुढारी’चे धाडस

शासकीय अधिकारी चांगले काम करीत असतात, त्यांच्या चांगल्या कामाची पोचपावती देताना त्यांचा सत्कार करण्याचे धाडस दै. ‘पुढारी’ने दाखवले. त्यामुळे हा एकप्रकारे महाराष्ट्र शासनाचाच सत्कार असून ‘पुढारी’ने त्यावर शिक्कामोर्तब केले असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री व मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी केले. जिल्ह्यात चांगले काम करणार्‍या व्यक्तींच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याची पुढारीची भूमिका ही कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले.

बेळगावमध्ये शिवसृष्टी उभारणार

बेळगावमध्ये कर्नाटक सरकारने छत्रपती शिवरायांचा पुतळा काढल्याचे मराठी बांधवांनी सांगितले. त्याठिकाणी शिवसृष्टी उभारण्याची तयारी मराठी बांधवांनी केली असून, आपण स्वत: त्यासाठी जाणार आहोत. तेथील सरकारने मला अडवून दाखवावे असे आव्हान मराठी भाषा व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कर्नाटक सरकारला दिले.

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे जपानमध्ये होणार अनावरण

छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा जपानमध्ये उभारण्यात आला असून, या पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य मला मिळाले आहे. 7 मार्च रोजी आपण त्यासाठी जपानला जाणार असल्याचे ना. उदय सामंत यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news