

चिपळूण शहर : गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळाली पाहिजेत यासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली लढा उभा करण्याचा एकमुखी ठरावाद्वारे निर्णय राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या (रामिम) कार्यालयात झालेल्या सर्व संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ‘रामिम’ संघाचे सरचिटणीस व कुंभार्ली (ता. चिपळूण) गावचे सुपुत्र गोविंदराव मोहिते यांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी कार्यरत कामगार संघटनांची बैठक घेतली. यावेळी आमदार सचिन अहीर यांच्या नेतृत्वाखाली पावसाळी अधिवेशनात महाआंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत सेलू आणि वांगणी येथील गृहनिर्माण प्रकल्पाला विरोध करण्यात आला आहे. मुंबई ऐवजी सेलू आणि वांगणी येथे गृहनिर्माण प्रकल्प उभा करण्यासाठी प्रयत्नशील असणार्यांचा कामगार संघटनेचा? ? बैठकीत तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. तसेच कामगारांना जाचक ठरणारे, अन्यायी कलम 17 रद्द करण्यात यावे, अशी एकमुखी मागणी करण्यात आली.
या बैठकीला हेमंत धागा जन कल्याण फाउंडेशनचे हेमंत गोसावी, गिरणी कामगार सेनेचे अध्यक्ष सत्यवान उभे, सरचिटणीस बाळ खवणेकर, संयुक्त मराठीचे रमाकांत बने, सर्व श्रमिक संघटनेचे कल्पेश नाडकर्णी, राजाराम मोरे, एनटीसी कामगार असोसिएशनचे बबन मोरे, गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समितीचे आनंद मोरे, सचिन चव्हाण, इंद्रायणी सावंत, शंकर मगदूम, अॅड. बबन मोरे, संयुक्त मराठी चळवळीचे रवींद्र गवळी, इब्राहिम आदी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे निवृत्ती देसाई,अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनील बोरकर, शिवाजी काळे आदी पदाधिकार्यांनी मार्गदर्शन केले.