

रत्नागिरी : मी नुकतीच पहिली ते दहावीपर्यंतची मराठी पुस्तके मागून घेतली आणि वाचलीही. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मराठी व्याकरणाच्या चुका दिसल्या आहेत. पहिलीच्या बालभारती पुस्तकांमध्ये पहिली दोन पाने ही चित्रांची आहेत. त्यात कुठेच साहित्य दिसत नाही. मुलांच्या कल्पनाशक्तीला मोकळे करा, मी पाणी पिलो, मूर्त्या पाहिल्या, हत्तीणीचा कळप असे अनेक शब्द आहेत. भाषेमध्ये वेडेपणा आला आहे. मुळात मराठी भाषा ही शुद्ध असली पाहिजे अशी अपेक्षा, मागणी ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी मुलाखतीत व्यक्त केली. महाराष्ट्र शासन मराठी भाषा, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, 14 फेब्रुवारी रोजी रत्नागिरी येथील वि. दा. सावरकर सभागृहात मधुभाई साहित्य, समाज, कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रारंभी पद्मश्री कर्णिक यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. मराठी भाषा ही शुद्ध असली पाहिजे, भाषेचे प्रमाणीकरण झाले पाहिजे, अशी मागणी कार्यक्रमास उपस्थित असलेले मराठी भाषामंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली तसेच लवकरच सरकारला निवेदन देऊ, असेही सांगितले.
या रत्नागिरी जिल्ह्याचे खूप उपकार आहेत. या जिल्ह्याने मला यश दिले. मी लहानपणी हुशार विद्यार्थी नव्हतो. तरीही मॅट्रिक याच रत्नागिरीमध्ये झालो. चौदाव्या वर्षापासून लिखाणास सुरुवात केली. कविता लिहित गेलो. तीस वर्षानंतर लिखाणास यश मिळाले. माझी कविता, पहिली कथा छापून आली. आई आजारी असताना तिला याबद्दल माहिती दिली. आईला जेव्हा कळलं ती अक्षरशः रडली. बाळा खूप मोठा हो म्हणत त्यांनी मला आशीर्वाद दिला. तेथूनच लिखाणाचा प्रवास सुरू झाला आणि तिसरे यश म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद याच रत्नागिरीच्या मातीत मी मला मिळाले. निवडून येण इतकं सोपं नव्हतं तरीही दिग्गज साहित्यिकांनी मला पाठिंबा देत उत्तम मताने निवडून दिले आणि मी अध्यक्ष झालो. त्यामुळे माझ्या यशात रत्नागिरीचा खूप मोठा वाटा आहे, रत्नागिरीचे आभार मानावे तितके कमीच आहे, असेही कर्णिक यांनी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई यासह अनेक जिल्ह्यांमध्ये साहित्य परिषद संघटना होती. कोकणात स्वतंत्र असे साहित्य परिषद नव्हते. साहित्यामध्ये सर्वाधिक वाटा आणि योगदान हे कोकणाने दिले. म्हणून कोकणात कोकण साहित्य परिषद असावी म्हणून यासाठी प्रयत्न केले आणि साहित्य परिषदेची निर्मिती केली.अनेक साहित्यमध्ये विविध शहर, जिल्ह्याचे वर्णन असतात मात्र कोकणाचे वर्णन खूप कमी होते. त्यामुळे कोकणातील संस्कृती, नद्या, डोंगर, समुद्र हे आजच्या पिढीला कळल पाहिजे. त्यामुळे पुस्तकांच्या रूपामध्ये मी ते काम केले. मुळात लेखनाची, वाचनाची आवड लहानपणापासून होती. साने गुरुजींच्या भेटीमुळे मी भारावून गेलो. साने गुरुजींच्या मार्गदर्शनामुळे आणि आईमुळे, मी वाचलेल्या पुस्तकांमुळे लेखनाला प्रेरणा मिळाली.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, 10 वी पर्यत मराठी भाषा अनिवार्य करावी, मुंबईत मराठी भवन उभे करावे यासाठी प्रयत्न आणि संघर्ष केला. 2019 साली भर पावसात आझाद मैदानात आंदोलन केले. जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काही माणसे मला भेटली. त्यावेळी आम्ही आमच्या मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या. त्यावेळी फडणवीस यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या. आता लवकरच मराठी भाषा भवनही मुंबईत होईल, असेही कर्णिक यांनी सांगितले.
मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 1962 साली आल्यानंतर मालगुंड येथील कवी केशवसुत यांचे घर पडले होते. भिंती पडल्या होत्या. खूप वाईट वाटलं अस्वस्थ वाटलं. ज्यावेळी मी लंडनला गेलो त्यावेळेस शेक्सपियर यांचे स्मारक पाहिले तर उत्तम स्मारक बांधण्यात आले होते. आणि मी भारावून गेलो होतो. जेव्हा मालगुंडला आलो तर तेथील काही साहित्यिकांनी, नागरिकांनी कवी केशवसुत यांचे स्मारक व्हावे, अशी मागणी मी अध्यक्ष असताना समारोपाच्या भाषणामध्ये केली. कवी केशवसुत स्मारक व्हावे, यासंदर्भात आवाहन केले. नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि 12 हजार रुपये त्या काळी जमले. दहा वर्षे सतत संघर्ष केल्यानंतर कवी केशवसुत यांचे स्मारक आज उभारले. या यशाचे श्रेय माझे नसून सर्व नागरिक, साहित्यिकांचे आहे.
मला अपयशाने यशाकडे नेले. त्यामुळे आजच्या तरुण पिढीने अपयशाला न घाबरता कष्ट, जिद्दीने समोर जावे. लहानपणी एसटी नसायची, आठ किलोमीटर आम्ही चालत जायचो. दहावीपर्यंत शिक्षण घेतले. दहावी पास होणाऱ्या एका साहित्यिकाने स्वतःची शाळा सुरू केली. हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेतात यात मी संतुष्ट आहे. आयुष्यात जे मला मिळालं त्यात मी समाधानी आहे असेही कर्णिक यांनी सांगितले. ही प्रकट मुलाखत प्राध्यापक अशोक ढवण, नमिता कीर, अभिजीत हेगशेट्ये, अशोक वागणे, अरुण म्हात्रे यांनी घेतली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, जिल्हा परिषदेच्या सीईओ विद्या रानडे यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील व कोकण विभागातील साहित्यिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.