Ratnagiri News : लोटे औद्योगिक वसाहतीत पाइपलाइन फुटून लाखो लिटर पाणी वाया!

अठरा तासांहून अधिक काळ पाणीगळती सुरूच; एमआयडीसीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
Ratnagiri News : लोटे औद्योगिक वसाहतीत पाइपलाइन फुटून लाखो लिटर पाणी वाया!
Published on: 
Updated on: 

खेड : राज्यातील अनेक भागांना पाणीटंचाईच्या झळा बसत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या लोटे औद्योगिक वसाहतीत मात्र लाखो लिटर पाण्याची नासाडी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औद्योगिक वसाहतीतील पाण्याची पाइपलाइन फुटल्याने अठरा तासांहून अधिक काळ पाणीगळती सुरू होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले असून, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

एकीकडे पाणीटंचाईमुळे लोटे औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, तर दुसरीकडे पाइपलाइन फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र आहे. पाणीपुरवठा यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीबाबत एमआयडीसी प्रशासन किती दक्ष आहे, असा सवाल या घटनेमुळे उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाइपलाइन दुरुस्तीचे काम करणारा ठेकेदार काम अर्धवट सोडून गेल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पाइपलाइन फुटल्यानंतर सलग अठरा तासांहून अधिक काळ पाणी वाहत असतानाही गळती रोखण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झालेली असताना पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे आवश्यक आहे. अशा वेळी औद्योगिक वसाहतीतील पाणीपुरवठा यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्यास ही बाब गंभीर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारासह जबाबदार अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, एमआयडीसीचे अधिकारी गेल्या अठरा तासांपासून पाणीगळती रोखण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती काही कामगारांनी दिली. मात्र, गळती थांबवण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य खेड येथे उपलब्ध नसल्याने ते रत्नागिरीहून मागवावे लागल्याचेही समजते. त्यामुळे दुरुस्तीच्या कामाला विलंब झाल्याचे सांगितले जात आहे.

एका बाजूला उद्योजक पाणीटंचाईने त्रस्त असताना दुसऱ्या बाजूला लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याने लोटे औद्योगिक वसाहतीतील परिस्थितीवर नाराजी व्यक्त होत आहे. एमआयडीसी प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पाणीगळती तातडीने रोखावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी पाणीपुरवठा यंत्रणेची नियमित देखभाल आणि दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.