

रत्नागिरी : एलईडी प्रकाशातील बेकायदेशीर मासेमारीवर कारवाईबाबत कोणतीही हालचाल होत नसल्याने शाश्वत मच्छीमार हक्क संघाचे मच्छीमार मंगळवारी सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयावर धडक देणार असल्याचे संघाचे अध्यक्ष रणजित ऊर्फ छोट्या भाटकर यांनी सांगितले. हवामान विभागाचा 5 ऑक्टोबरपर्यंत धोक्याचा इशारा असतानाही काही पर्ससीन नौकांकडून एलईडी मासेमारी झाल्याचा आरोपही भाटकर यांनी केला आहे.
दिवसा एलईडीसाठी लागणारे जनरेटर राजीवडा आणि मिरकरवाडा बंदरातून समुद्रात जात आहेत. त्या नंतर समुद्रात दिवसरात्र एलईडी प्रकाशात मासेमारी होत आहे. राज्याच्या जलधी क्षेत्रात ही मासेमारी होत असून 3 ते 5 ऑक्टोबरपर्यंत समुद्रात मासेमारीसाठी जावू नये, असा इशारा असतानाही एलईडी मासेमारी सुरू होती. एलईडी प्रकाशातील मासेमारी बेकायदेशीर असून या प्रकरणी 5 लाख रुपये दंडाची तरतुद आहे. तरीही मासेमारी बिनबोभाट सुरू आहे.
राज्याच्या जलधी क्षेत्रात म्हणजेच 12.5 नॉटीकल मैलच्या आतील समुद्रात ही मासेमारी होत असल्याने पारंपरिक मच्छीमारांना मासळी मिळेनाशी झाली आहे. 5 ऑक्टोबरपर्यंत धोक्याचा इशारा असल्याने पारंपरिक मच्छीमार नौका बंदरातच होत्या. या सर्व घडामोडींमुळे पारंपरिक मच्छीमार अडचणीत आला आहे.