Fish Price Hike | 'एलईडी' मच्छीमारीचा फटका: पावसाळ्याआधीच सुकी मासळी महागली
अनुज जोशी
LED Fishing Dry Fish Price Hike
खेड: पावसाळा जवळ आल्यावर मत्स्यप्रेमींच्या ताटात सुक्या मासळीचा हक्काचा शिदोरा असतो. मात्र, यावर्षी सुकी मासळी सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. कोकण किनारपट्टीवर एलईडी मच्छीमारी पद्धतीचा वाढता प्रभाव पारंपरिक मासेमारीच्या अडथळा ठरत आहे. त्यामुळे सुक्या मासळीचा पुरवठा घटला आहे. परिणामी, अगोटच्या बेगमीसाठी लागणाऱ्या सुक्या माशांचे दर गगनाला भिडले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड परिसरातील सुक्या मासळी बाजारात सध्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसत असली, तरी विक्रेते मात्र नाराज आहेत. अनेक महिला विक्रेत्या ग्राहकांची वाट पाहत बसलेल्या दिसत आहेत. पावसाळ्यात मासेमारीस बंदी असल्याने सुकी मासळीच खवय्यांची शेवटची आशा असते. परंतु, एलईडी मच्छीमारीमुळे पारंपरिक जाळ्यांत मासे सापडत नसल्याने, सुकविण्यासाठी लागणाऱ्या माशांची कमतरता भासत आहे.
या परिस्थितीमुळे बाजारातील दर प्रचंड वाढले आहेत. यंदा ढोमा २००, चेवनी ३००, कोलिम १५०, आंबड काड ४००, बोंबील ४००, बगी ३००, आणि सोडे तब्बल १००० प्रति किलोने विकले जात आहेत. सध्या अगोटसाठी बाजारात सरगर्मी असली तरी यंदा मासेमारीतील ही अडचण कोकणातील मच्छीमार समाजाच्या उपजीविकेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पावसाळ्यात ताटात मासे टिकवण्यासाठी खवय्यांना या महागाईचा सामना करावा लागणार, हे निश्चित आहे.
एलईडी मच्छीमारीमुळे आमच्या हातात मासेच राहत नाहीत - प्रतिभा कालेकर
हर्णे दापोली येथील पाज पंढरी गावातील महिला विक्रेता प्रतिभा कालेकर सांगतात, “आम्ही वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने मासे सुकवत आलोय, पण एलईडी मच्छीमारीमुळे आमच्या हातात मासेच राहत नाहीत. ग्राहकही आता किंमती ऐकून मागे फिरतात.”

