

गुहागर शहर : राज्यातील महायुतीच्या अंतर्गत वादाचा फटका स्थानिक पातळीवरदेखील बसू लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीचे कोणतेही नसलेले ठोस धोरण, स्वतंत्र निवडणुका लढवण्याची स्थानिक नेत्यांची वक्तव्ये यामुळे जिल्ह्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. यामुळे महायुतीमध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता असून सर्वसामान्य कार्यकर्ते संभ्रमावस्थेत पडले आहे.
कोकणातील भाजप व शिवसेना शिदे गटाच्या नेत्यांमधून एकमेकांविरोधात टीकाटिपण्णी सुरू असल्याने सतत वादाची ठिणगी पडत महायुतीत साशंकता निर्माण झाली आहे. रायगडमधील मंत्री भरत गोगावले यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाऊन भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यावर केलेले आरोप राणे व मंत्री नितेश राणे यांच्या वर्मी लागले आहेत. यामुळे दोन्ही पक्षांतील तणाव स्थानिक पातळीवर जास्तच वाढला आहे. याला प्रत्युत्तर देत मंत्री नितेश राणे यांनी कोकणात भाजपचे वर्चस्व असल्याचे सांगून येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची जणू घोषणाच केली आहे. यामुळे महायुतीतील दोन्ही पक्षांत आता वर्चस्वासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.
स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना या तिन्ही पक्षांत युती न झाल्यास होणारे जागांचे विभाजन टळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जागा लढविण्याची संधी कार्यकत्यांना मिळणार असल्याने तिन्ही पक्षांच्या कार्यकत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जिल्ह्यात भाजपतर्फे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची तयारी आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर विविध कार्यक्रम आयोजित करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येणार्या निवडणुका कोणाला लाभदायक ठरणार याकडे आता जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच राज्यातील नेते युतीबाबत कोणता निर्णय घेणार याकडे कार्यकत्यांचे लक्ष आहे.