

चिपळूण शहर : पश्चिम महाराष्ट्र व कोकणला जोडणारा कुंभार्ली घाट ओळखला जातो. पश्चिम महाराष्ट्राशी कोकणचे नाते व दळणवळणासाठीचा हा सर्वात पहिला महत्त्वाचा घाट असून सद्यस्थितीत या घाटातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. हा घाट वाहतुकीसाठी सर्व बाजूने असुुरक्षित झाला आहे. अनेक वर्षे या घाटाच्या सुरक्षा व दुरूस्तीसाठी आजपर्यंत करोडो रुपये खर्च होऊनदेखील घाटातील सुरक्षित वाहतूक म्हणजे अवघड जागी दुखण्यावर सुरू असलेले उपाय अपयशी ठरल्याचे सांगितलेे जात आहे.
राष्ट्रीय महामार्गात समावेश झालेल्या गुहागर-विजापूर या महामार्गांतर्गत शहरानजीकच अवघ्या काही कि.मी. अंतरावरील कुंभार्ली घाटाची सुरुवात होते. सुमारे 22 कि.मी. लांबीचा हा घाट अत्यंत अवघड वळणे तसेच तीव्र चढ-उतार, नागमोडी वळणे घेत पश्चिम महाराष्ट्राकडे जातो. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचे नाते निर्माण करणारा हा सर्वात जुना घाट म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ या घाटात वाहतुकीस आवश्यक रस्ते आणि संरक्षक कठडे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना न केल्यामुळे आजच्या घडीला धोकादायक ठरत आहे. रस्ते आणि संरक्षक कठडे यासाठी मागील अनेक वर्षांच्या खर्चाचा अंदाज घेतला असता त्या खर्चात पर्यायी चौपदरी रस्ता होऊ शकतो. एवढा खर्च केवळ देखभाल-दुरुस्तीवर झाल्याचे सांगितले जाते. सद्यस्थितीत रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था होण्यास सुरुवात झाली आहे.
अवघड वळणे, तीव्र चढ-उतारावरील रस्ते मोठ्या प्रमाणात उखडले गेले आहेत. उखडलेल्या रस्त्यावरील खड्डे चुकवताना अनेक वाहनचालकांची तारांबळ उडते. गेल्या महिनाभरात छोटे-मोठे अपघात होऊन तासभरापेक्षा अधिक काळ वाहतूक कोंडी होऊन वाहनांची वर्दळ ठप्प होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचप्रमाणे खोल दरीच्या बाजूने असलेले संरक्षक कठडे कोसळले आहेत तर काहींची पडझड झाली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींसह प्रवासी व वाहनचालकांनी याकडे अनेकवेळा लक्ष वेधूनदेखील घाटातील रस्ते आणि संरक्षक कठडे सुस्थितीत करण्यासाठी ठोस नियोजन केले नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. एका बाजूला उंच कडा तर दुसऱ्या बाजूला खोल दऱ्या. त्यातच अवघड नागमोडी वळणे, तीव्र चढ-उतार अशा भौगोलिक रचनेत सुमारे 22 कि.मी.चे अंतर वाहनचालकांना पार करताना जीव मुठीत घ्यावा लागत आहे. गुहागर-विजापूर महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे. मात्र, सुरक्षित रूंदीकरण करण्याबाबत कोणतेही नियोजन झाले नाही. सद्यस्थितीत मात्र या ठिकाणी असलेल्या धोकादायक वळणांसहीत तीव्र चढ-उतारावरील रस्ते खड्ड्यांनी व्यापले आहेत. काही ठिकाणच्या भागातील संरक्षक कठडे पडण्यास सुरुवात झाली आहे. एकूणच या महत्त्वाच्या घाटातील वाहतुकेीच्या दृष्टीने सुरक्षित व सुस्थितीतील रस्ते आणि संरक्षक कठडेेेे करण्याबाबत लोकप्रतिनिधी व प्रशासनाने उपाय योजावेत, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.