लांजा : लांजा शहराच्या डंपिंग ग्राऊंड प्रकल्प गेली तीन वर्षे वादाच्या भोवर्यात अडकला आहे. कोत्रेवाडीने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाकडून अपेक्षित उत्तर मिळेल, अशी अपेक्षा असताना तुम्ही मतदानावर बहिष्कार न टाकता मतदान करा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी केले. मात्र, डंपिंग ग्राऊंड प्रश्नी अपेक्षित उत्तर प्रशासनाकडून मिळत नसेल, तर निवडणुकीवर बहिष्काराच्या निर्णयावर नागरिकांनी ठाम राहण्याचा निर्धार कायम ठेवला आहे.
कोत्रेवाडी ग्रामस्थांनी निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार कोणाच्याही सांगण्यावरून नसून प्रत्येक नागरिकाने उत्स्फूर्तपणे व स्वयंप्रेरणेने हा निर्णय घेतला असल्याचे सर्व कोत्रेवाडी नागरिकांकडून सांगण्यात आले. लांजा नगरपंचायतीच्या वतीने कोत्रेवाडी येथे कोणत्याही निकषात न बसणारा डंपिंग ग्राऊंड प्रकल्प या ठिकाणी जोर जबरदस्तीने राबविला जात असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. या विरोधात नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली असून गेल्या चार वर्षांपासून या विरोधात मोर्चा, आंदोलने व उपोषणे या मार्गाने आपला विरोध दर्शविलेला आहे. या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी राजापूर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी शनिवारी लांजा तहसील कार्यालय येथे कोत्रेवाडी नागरिकांची बैठक आयोजित केली होती.
या बैठकीला लांजा तहसीलदार प्रियांका ढोले, लांजा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी राणे, पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे उपस्थित होते. सुरुवातीला कोत्रेवाडी नागरिकांनी आपली भूमिका मांडली. वाडी-वस्तीलगत जोर जबरदस्तीने व निकषात न बसणारा डंपिंग प्रकल्प नियोजित केला जात असल्याने आम्ही नागरिक उद्ध्वस्त होणार आहोत. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी मांडली.
दरम्यान, डंपिंग ग्राऊंड आणि निवडणूक मतदानावर बहिष्कार या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. त्यामुळे नागरिकांनी मतदानावर बहिष्कार न टाकता मतदान करा. तुम्हाला एखादा किंवा सर्वच लोकप्रतिनिधी योग्य वाटत नसतील, तर तुम्हाला नोटाचादेखील पर्याय दिलेला आहे. त्या पर्यायाचा वापर करा. परंतु, तुम्ही मतदानाचा आपला हक्क बजवा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. जॅसमिन यांनी केले. मात्र, आमचा विरोध हा कोणत्याही उमेदवाराला नाही, तर डंपिंग ग्राऊंड प्रकल्पाला विरोध आहे. हा प्रकल्प जोपर्यंत रद्द होत नाही, तोपर्यंत कोत्रेवाडी नागरिक उत्स्फूर्तपणे या विरोधात लढा देणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या मतदानावर बहिष्कार टाकला असल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले.
या बैठकीला कोत्रेवाडीतील ग्रामस्थ मंगेश आंबेकर, संतोष कोत्रे, दीपक आडविलकर, राजाराम कोत्रे, महेश साळवी, श्रीधर साळवी, श्रीकांत साळवी, संजय कोत्रे, राजेश सुर्वे, मयुरेश आंबेकर, संदीप खामकर, शरद शिंदे, जयराम साळवी, रामनाथ साळवी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.