

रत्नागिरी : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत अखेर चुरस निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीनेही मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. उबाठाचे उपनेते तथा माजी आमदार बाळ माने यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आल्याने ही निवडणूक आता थेट महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी रंगणार आहे.
दुसरीकडे महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरेंच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे . आता केवळ अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे. महायुतीच्या वरिष्ठ पातळीवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा व अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले. या प्रक्रियेत बहुतांश मतदारांनी अनिकेत तटकरे यांच्या नावाला पसंती दर्शवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महायुतीने उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेतल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
दरम्यान, रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेला तिढा सोडवण्यासाठी महायुतीत मोठी तडजोड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्रीपद देण्यात येणार असून त्याबदल्यात खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना विधान परिषद उमेदवारी देण्याचा फॉर्म्युला ठरल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार कालपर्यंत निश्चित नव्हता. मात्र मुंबईत झालेल्या बैठकीत विरोधी पक्षनेत्यांनी “लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी निवडणूक लढवणे आवश्यक” अशी भूमिका घेत बाळ माने यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे कोकणातील निवडणुकीत आता रंगत वाढली आहे. राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारसंख्येच्या आकडेवारीनुसार महायुती मजबूत स्थितीत आहे. शिवसेनेकडे ३३४, भाजपकडे २६४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे १६५ मतदार आहेत. मात्र महाविकास आघाडीच्या एन्ट्रीमुळे निवडणुकीत चुरस वाढण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.