Aniket Tatkare : आमदार अनिकेत तटकरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

महायुतीचे शक्तिप्रदर्शन; जुईली जुवेकर यांच्या भूमिकेकडे लक्ष
Aniket Tatkare
आमदार अनिकेत तटकरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
Published on
Updated on

रत्नागिरी : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून महायुतीचे अधिकृत उमेदवार अनिकेत तटकरे आज (सोमवारी) जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर या निवडणुकीच्या राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.

अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमासाठी महायुतीने मोठी तयारी केली असून, रविवारपासूनच रत्नागिरीत राजकीय हालचाली वाढल्या आहेत. महायुतीचे अनेक प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शहरात दाखल झाले आहेत. आजच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.

महायुतीतील सर्व घटक पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने महायुतीची एकजूट आणि ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती आणि नेत्यांचे शक्तिप्रदर्शन यामुळे आजचा कार्यक्रम विशेष लक्षवेधी ठरणार आहे. दरम्यान, अपक्ष उमेदवारी जाहीर केलेल्या जुईली जुवेकर यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महायुतीचा अधिकृत उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्या उमेदवारी कायम ठेवणार की माघार घेणार, याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. त्यांच्या निर्णयाचा निवडणुकीच्या पुढील समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ हा राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचा मानला जातो. अनिकेत तटकरे यांनी यापूर्वीही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले असल्याने त्यांच्या उमेदवारीकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे. आज प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सादर करणार असून त्यानंतर या निवडणुकीच्या प्रचाराला अधिकृतपणे वेग येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news