केळशीतील वाळूच्या टेकडीचे अस्तित्व धोक्यात

टेकडी दरवर्षी ढासळतेय; राज्य शासनासह पुरातत्व विभाग देईना लक्ष
केळशीतील वाळूच्या टेकडीचे अस्तित्व धोक्यात
Published on
Updated on

प्रवीण शिंदे

दापोली : १६ व्या शतकात त्सुनामीमुळे निर्माण झालेल्या कोकण किनारपट्टीवरील केळशी येथील वाळू टेकडी संशोधनाला २०२५ यावर्षी ३५ वर्ष पूर्ण होत आहेत. न्यायालयानेदेखील या टेकडीचे महत्त्व ओळखून तिचे संवर्धन होण्यासाठी शासनाला निर्देश दिले होते. तर या टेकडीवरून जाणाऱ्या रेवसेरे डी या सागरी पुलाचा मार्गदेखील बदलण्यात आला होता.

दरम्यान, संशोधनात वाळूच्या टेकडीच्या भूगर्भात घरांचे अवशेष, भांडी विहीर व नाणी सापडायला लागली. ही माहिती पुणे येथील पुरातत्व विभागाला कुणीतरी त्यावेळेस सांगितली. त्यामुळे या टेकडीचे ऐतिहासिक महत्त्व वाढले. वाळूची टेकडी केळशीचे पर्यटन जागतिक पटलावर टिकवून ठेवेल, असे वाटत असताना हीच वाळूची टेकडी दिवसेंदिवस ढासळत आहे. राज्य शासन आणि पुरातत्व विभाग याकडे ढुंकूनही पाहत नसल्याचे वास्तव असून टेकडीची झालेली दैना सगळं सांगून जात आहे.

२००७ साली केळशी खाडीवर सागरी पूल बांधण्यास परवानगी मिळाली होती. त्यानुसार या सागरी मार्गाचे काम सुरू झाले. हा पूल वाळूची टेकडी आहे तिथून जाणार होता. त्यामुळे ही टेकडी नष्ट झाली असती. त्यावेळी प्रणतीर्थ मिशन यांनी २००७ साली या बांधकामावर हरकत नोंदवत न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे १२ वर्षे या सागरी मार्गाचे काम रखडले. मात्र ३/८/२०१९ रोजी प्रणतीर्थ मिशन यांच्या बाजूने न्यायालयाने निकाल देत वाळूच्या टेकडीचे संवर्धन व्हावे, असे शासनाला निर्देश दिले आहेत.

निसर्गाचा चमत्कार म्हणून सुरुवातीला अनेक पर्यटक या वाळूच्या टेकडीला भेट देत होते. १६ व्या शतकातील जागतिक एकमेव वाळूची टेकडी म्हणून या टेकडीविषयी राज्यभरात कुतूहल वाढले होते. मात्र कालांतराने टेकडीवर वाढलेली झाडी आणि वाळूचा समुद्रात निघून गेलेला भाग यामुळे पर्यटकांनी मात्र अक्षरश: इकडे पाठ फिरवली आहे.

न्यायालयाने या टेकडीचे संवर्धन करा, असे निर्देश शासनाला देऊनदेखील पुरातत्व विभागाने अजिबात लक्ष दिले नाही. त्यामुळे ही टेकडी अखेरची घटका एक प्रकारे मोजत आहे. केळशी खाडीवर होत असलेल्या सागरी पुलाला त्यावेळेस वाळूच्या टेकडीचा अडथळा निर्माण झाला नसता, तर या आधीच केळशी परिसराचा विकास झाला असता. मात्र वाळूच्या टेकडीचे संवर्धन ही नाही आणि या भागाचा विकासही नाही, अशी अवस्था झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news