

रत्नागिरी : कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्हा यांच्यातील रेल्वे संपर्क अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी पुढाकार घेतला आहे. नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवून धुळे रेल्वेस्थानकाचा ‘ओरिजिनेटिंग–टर्मिनेटिंग कोचिंग टर्मिनल’ म्हणून विकास करण्याच्या प्रस्तावाची तांत्रिक, परिचालनात्मक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासण्याची मागणी केली आहे. यामुळे कोकणातील पर्यटनाच्या विकासास अधिक मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
नारायण राणे यांनी २१ ऑक्टोबर २०२६ रोजी पाठविलेल्या पत्रात कोकणातील प्रमुख पर्यटनस्थळे आणि उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्हा यांना रेल्वेने जोडण्याच्या संभाव्यतेवर भर दिला आहे. या रेल्वे संपर्कामुळे प्रवाशांची वाहतूक अधिक सुलभ होण्याबरोबरच पर्यटन, रोजगारनिर्मिती आणि प्रादेशिक व्यापाराला चालना मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले आहे.
धुळे रेल्वेस्थानकाचा टर्मिनल म्हणून विकास करण्यासाठी आवश्यक यार्ड पुनर्रचना, फलाटांचा विस्तार, पिटलाईन सुविधा, रेल्वेगाड्यांच्या रेकच्या साठवणुकीसाठी व्यवस्था तसेच देखभाल व दुरुस्तीच्या पायाभूत सुविधांचा टप्प्याटप्प्याने विकास करण्याची आवश्यकता असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.