

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक (12 वी) प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याच्या एकूण निकाल 91.88 टक्के लागला आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळामध्ये कोकण बोर्ड राज्यात अव्वल ठरलं आहे. यावर्षी बोर्डाचा निकाल 96.74 टक्के लागला आहे. यामध्ये मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण उत्तीर्णामध्ये जास्त आहे. एकदंरीत कोकणातीलच मुले सलग 13 वर्षे राज्यात हुशार ठरली आहेत.
फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आला. याची माहिती बोर्डातर्फे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी विभागीय सचिव सुभाष चौगुले, सहाय्यक सचीव दीपक पवार व मनोज शिंदे हे उपस्थित होते. कोकण बोर्डाकडून घेण्यात आलेल्या या परीक्षेला एकूण 23 हजार 563 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 22 हजार 797 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. रत्नागिरीतून 15 हजार 297 पैकी 14 हजार 635 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याचा निकाल 95.67 इतका लागला आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 8 हजार 266 पैकी 8 हजार 162 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या जिल्ह्याचा निकाल 98.74 टक्के लागला आहे, तर कोकण बोर्डाचा निकाल 96.74 टक्के इतका लागला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात 38 परीक्ष केंद्र होती तर 156 कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी परीक्षेला बसले होते. शाखानिहाय निकालाची माहिती बघितली तर रत्नागिरी जिल्ह्यातून विज्ञान शाखेत 5हजार 664 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 5 हजार 517 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेचा निकाल 97.40 टक्के इतका लागला. कला शाखेसाठी 3 हजार 477 पैकी 3 हजार 141 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेचा निकाल 90.33 टक्के लागला. वाणिज्य शाखेसाठी 5 हजार 696 पैकी 5 हजार 542 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेचा निकाल 97.29 टक्के लागला. व्यावसायिक शाखेतील 300 पैकी 287 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेचा निकाल 95.66 टक्के लागला. तर टेक्निकल सायन्स 160 पैकी 148 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेचा निकाल 92.50 टक्के लागला. या परीक्षेला जिल्ह्यातून 7 हजार 705 मुले बसली होती. त्यापैकी 7 हजार 242 मुले उत्तीर्ण झाली. उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 93.99 टक्के आहे. तर 7हजार 592 पैकी 7हजार393 मुली उत्तीर्ण झाल्या. टक्केवारीमध्ये हे प्रमाण 97.67 टक्के आहे. यामुळे यावर्षी सुद्धा मुलींनीच बाजी मारली.
या वर्षी श्रेणी, गुण सुधार योजना लागू करण्यात आली आहे. जे विद्यार्थी पुन्हा या परीक्षेसाठी बसण्यास इच्छुक आहेत. त्यांना तीन संधी देण्यात येणार आहे. उत्तरपत्रिकेचे पुनर्मुल्यांकन करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेचे छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसात पुनमर्मुल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करावा. गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी 6 मे ते 20 मे पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे, अशी माहिती विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी दिली.
यावर्षी मुले-मुली यांचा तुलनात्मक निकाल बघितला तर गतवर्षी मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा 2.53 टक्के अधिक आहे. यावर्षी परीक्षेतील गैरमार्ग प्रकरणे (कॉपी) 1 होते, तर गतवर्षी हे प्रमाण 9 इतके होते. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या निकालात 0.77 टक्के इतकी घट झाली आहे.