

रत्नागिरी : कोकणच्या हिरव्यागार निसर्गात शेतीचे मोठे क्षेत्र असूनही तब्बल ३ लाख ७४ हजार हेक्टर जमीन पडीक असल्याचे सरकारी आकडेवारीतून समोर आले आहे. त्यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांतील पडीक क्षेत्राचा वाटा सर्वाधिक असून, दोन्ही जिल्ह्यांत मिळून सुमारे २ लाख ८७ हजार हेक्टर जमीन लागवडीबाहेर आहे. एकीकडे शेतीसाठी मजूर मिळत नसल्याने आणि वाढत्या खर्चामुळे शेतकरी शेतीपासून दूर जात असताना, दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी करून ती पडीक ठेवणाऱ्यांना शेती उत्पादनाखाली जमीन आणण्याचे आवाहन शासनाने केले आहे. त्यामुळे कोकणातील पडीक जमिनींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या २०२३-२४ च्या जमीन वापरविषयक आकडेवारीनुसार, कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमध्ये चालू पड आणि इतर पड मिळून ३ लाख ७४ हजार २०० हेक्टर क्षेत्र नोंदवले आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख ७१ हजार ३०० हेक्टर, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ लाख १५ हजार ७०० हेक्टर क्षेत्र पडीक आहे. रायगडमध्ये ५९ हजार ६०० हेक्टर, पालघरमध्ये १३ हजार ९०० हेक्टर आणि ठाणे जिल्ह्यात १३ हजार ७०० हेक्टर क्षेत्राची नोंद आहे. विशेष म्हणजे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांतील पडीक क्षेत्र कोकण विभागाच्या एकूण पडीक क्षेत्राच्या सुमारे ७७ टक्के आहे. कोकणातील शेतीचे स्वरूप, भातशेती, आंबा-काजू बागायती आणि भौगोलिक परिस्थिती पाहता एवढ्या मोठ्या क्षेत्रातील शेती उत्पादनाबाहेर राहणे हा चिंतेचा विषय ठरत आहे.
दरम्यान, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी करून ती पडीक ठेवणाऱ्या जमीनधारकांनी पुढील तीन ते पाच वर्षांत शेती उत्पादन सुरू करावे, अशी भूमिका मांडली आहे. मात्र, स्वतःची शेती करणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी शासन ताब्यात घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शासनाची भूमिका नेमकी कोणत्या प्रकारच्या जमिनी आणि जमीनधारकांपुरती मर्यादित राहणार, याकडे लक्ष लागले आहे.
कोकणातील पडीक जमिनींचा प्रश्न केवळ जमीन ताब्यात घेण्यापुरता मर्यादित नाही. शेतीसाठी मजुरांची कमतरता, वाढता उत्पादन खर्च, वन्यप्राण्यांचा उपद्रव, सिंचनाच्या मर्यादा, बाजारपेठेतील अनिश्चितता आणि तरुण पिढीचे शेतीकडे झालेले दुर्लक्ष या कारणांचाही विचार करावा लागणार आहे. त्यामुळे पडीक जमीन पुन्हा लागवडीखाली आणण्यासाठी शासन कोणती धोरणात्मक पावले उचलणार, शेतकऱ्यांना कोणत्या सुविधा देणार आणि मोठ्या जमीनधारकांसाठी कोणती अंमलबजावणी यंत्रणा तयार करणार, हे प्रश्न महत्त्वाचे ठरणार आहेत.