

रत्नागिरी : मागील पंधरा दिवसांत ख्रिसमसपासून ते नववर्षापर्यंत लाखोंच्या संख्येने पर्यटक जिल्ह्यात दाखल झाले होते. या वर्षी गोव्याप्रमाणेच पर्यटकांनी रत्नागिरी जिल्ह्याला पसंती दिल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायाला सुगीचे दिवस आले होते. किनाऱ्यावर वॉटर स्पोर्टस्चा आनंद लुटतानाच पर्यटकांकडून मच्छीवर मोठा ताव मारला जात असतानाच कोकणी मेव्याच्या खरेदीलाही झुंबड दिसत होती. जिल्ह्यात आलेल्या पर्यटकांकडून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याने व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मे महिना, दिवाळीत कोसळलेला पाऊस यामुळे गतवर्षी जिल्ह्यातील व्यावसायिकांना पर्यटन हंगाम आधीच गुंडाळावा लागला होता. नोव्हेंबरमध्ये पावसाने उसंत घेतल्यामुळे यंदा ख्रिसमस ते नववर्षापर्यतचा कालावधी पर्यटनासाठी अनुकूल ठरला. त्याप्रमाणे हॉटेल, वॉटरस्पोर्टस अनेक व्यावसायिकांनी पर्यटकांच्या स्वागताची तयारी केली होती.
जिल्ह्यात दापोली, गुहागर, रत्नागिरी-गणपतीपुळे, संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक, मार्लेश्वर या ठिकाणांना पर्यटकांनी विशेष पसंती दिली. मागील तीन -चार वर्षात जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत पर्यटनदृष्ट्या केलेला विकास याकडेही पर्यटक आकर्षित झालेले पाहायला मिळाले. 20 डिसेंबरपासूनच जिल्ह्यात पर्यटकांची रेलचेल सुरु झाली होती. विशेष करुन 24 डिसेंबरपासून पुढे 2 जानेवारीपर्यंत हॉटेलमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती. राहण्याची सुविधा उपलब्ध न झाल्याने पर्यटकांना एसटी स्टॅण्डवर गाड्या पार्कींग करुन राहण्याची वेळ आली. हॉटेल बरोबरच लग्नाचे हॉलही फूल भरुन वाहत होते. जिल्ह्यातील गणपतीपुळे, गुहागर, दापोलीमध्ये किनारपट्टीवर वॉटरस्पोर्टस चालकांनाही यावेळी पर्यटकांकडून व्यवसायात मोठी उलाढाल झाली. खाडीमधील पर्यटनालाही पर्यटकांनी पसंती दर्शवल्याचे दिसून आले.
पर्यटकांकडून मटन, चिकनपेक्षा मासळीवर अधिक ताव मारला. खाडीतील मासळीबरोबरच सुरमई, पापलेट, सरंगा, कोळंबीला पर्यटक खवय्यांनी प्राधान्य दिल्याचे हॉटेल व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. कोकणातून आपल्या घरी परतताना पर्यटकांनी कोकणी मेवाही भरभरुन खरेदी केला. मँगो पल्प, आंबावडी, कोकम सरबत, करवंद सरबत, फणसपोळी, आंबा लोणचे यासारख्या कोकणी मेव्याची पर्यटकांनी मोठ्याप्रमाणात खरेदी केली.