

राजापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण जाहीर करताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी ग्वाही दिलेली आहे. तरीही राजापुरातील समस्त ओबीसी समाजाच्या भावना मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार किरण सामंत यांनी ओबीसी समाज बांधवांना दिली.
हैद्राबाद गॅजेटिअरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी, कुणबी-मराठा किंवा मराठा-कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीबाबत शासन निर्णय झाला आहे. या निर्णयाविरोधात राज्यात सर्वत्र ओबींसींकडून आंदोलने, निवेदने देण्याचे सत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी ओबीसी समाज बांधवांनी आमदार किरण सामंत यांची भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
तालुक्यात 80 टक्के ओबीसी समाज आहे. त्यामुळे शासनाने घेतलेला निर्णय हा ओबीसींना अडचणीत टाकणारा आहे. त्यामुळे निर्णय रद्द करण्यात यावा, ओबीसांच्या विविध मागण्या, समस्या या निवेदनाच्या माध्यमातून शासन दरबारी पोहोचवाव्यात, अशी मागणी यावेळी उपस्थित ओबीसी बांधवांनी केली. त्यावर आमदार किरण. सामंत यांनी समस्त ओबीसी समाजाच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवून ओबीसी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. यावेळी ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष महेश शिवलकर यांच्यासह चंद्रकांत जानस्कर, दीपक नागले, अॅड. शशिकांत सुतार, रवींद्र नागरेकर, प्रकाश कुवळेकर, संतोष हातणकर, दीपक बेंद्रे, प्रकाश झोरे, डी. एम. चव्हाण, विनोद शेलार, जितेंद्र पाटकर, श्रीकांत राघव, अरविंद लांजेकर, उमेश पराडकर, सुभाष नवाळे, रमेश सुद, बबन तांबे, प्रसाद गुरव, नरेश दुधवडकर आदी उपस्थित होते.