

लांजा : पावसाळ्यात ओलेचिंब भिजून वर्षा सहलीचा आनंद घ्यायचा असेल तर आता दूर जाण्याची गरज नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात सर्वात मोठा आणि सर्वाधिक पसंती असलेला मानवनिर्मित फेसाळणारा पांढराशुभ्र धबधबा म्हणजे खोरनिनकोचा धबधबा. या धबधब्याचा जिल्ह्याच्या पर्यटनक्षेत्रात आवर्जून नामोल्लेख करावा लागतो. गडद हिरव्या-निळ्या सह्याद्री पर्वत रांगांच्या कुशीत आणि गडदशार वनराईच्या सानिध्यात हा धबधबा पर्यटकांना मोहित करतो आहे. सध्या पावसाळा सुरू झाला असून संततधारपणे पडणार्या पावसामुळे हा धबधबा तुडुंब भरून प्रवाहित झाला असून, जिल्ह्यासह परजिल्ह्यातील पर्यटकांना खोरनिनको धबधबा साद घालतो आहे.
पावसाळ्यामध्ये धरणाच्या ओव्हरफ्लो झालेला पाणीसाठा या मानवनिर्मित धबधब्यामार्फत विसर्ग केला जातो. त्यामुळे पावसाळ्यात खोरनिनको धबधबा खळखळून वाहून पर्यटकांना मनसोक्त वर्षासहलीचा आनंद देतो. निसर्गाच्या सानिध्यात आणि कोसळणार्या पांढर्या शुभ्र पाण्यात वर्षा सहलीचा आनंद घ्यायचा असेल तर लांजा तालुक्यातील खोरनिनको धरणक्षेत्र आकर्षक ठरत आहे. मुचकुंदी नदीचे उगमस्थान असणार्या ठिकाणी उभारलेले मुचकुंदी धरणप्रकल्प आणि त्यावर उभारलेला मानवनिर्मित धबधबा हा पर्यटकांना आकर्षित करतो आहे. या धबधब्याच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे खोरनिनको धबधबा प्रशासकीय नोंदणीमध्ये आला आहे.
पूर्वेला सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला खोरनिनको धबधबा परिसरातील गावांसह तालुक्याच्या पर्यटन वैभवात अधिक भर घालतो आहे. या धबधब्यासह सह्याद्रीच्या कड्यावरून कोसळणारे पांढरेशुभ्र छोटे छोटे धबधबे डोळ्यांचे पारणे फेडतात. निसर्गदेवतेने मुक्तहस्ते उधळण केल्याने पावसाळ्यात खोरनिनको मुख्य धबधब्याच्या आजूबाजूंनी निसर्गाच्या विविध रंगछटा पाहायला मिळतात. धरणाच्या माथ्यावर जाऊन उंचावरून खाली डोकावून पाहताना दिसणारे खोरनिनको गाव व परिसर, घोंगावणारा थंडगार जोरदार वारा आणि वार्याचा वेग, सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर पसरलेले दुधाळ धुक्यांचे ढंग, विविध पक्ष्यांचे आवाज, धबधबा मानवनिर्मित असल्याने टप्प्या-टप्प्याने दहा ते पंधरा फूट उंच पायर्यांच्या आकाराचे असे चार ते पाच धबधबे तयार करण्यात आले आहेत. धबधब्यावरून फेसाळ पांढरे-शुभ्र कोसळणारे पाणी एकसमान पडताना दिसते, पाण्याचे उडणारे तुषार यासह पूर्वेला समोरील बाजूला विशाळगडाच्या डोंगर काड्यांचा काही भाग नजरेस पडतो. हे सर्व निसर्गसौंदर्य अनुभवायची वेगळीच अनुभूती खोरनिनको धरणावर मिळते. त्यामुळे लांजा तालुक्यातील खोरनिनको धबधब्याला पावसाळ्यात एकदातरी आवर्जून पर्यटकांनी भेट द्यायला हवी.
खोरनिनको धबधबा मानवनिर्मित असून लांजा तालुक्याच्या पूर्व भागात सह्याद्रीच्या खोर्यांमध्ये आहे. मात्र खोरनिनको धरणाचे पात्र सखोल असून, धबधबा क्षेत्रात दगड, कातळभाग तर जास्त प्रमाणात पाऊस पडल्यास धबधब्याच्या पाणी प्रवाहात वाढ होत असते व बाजूने संरक्षक भिंत नसल्याने अतिउत्साह धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे खोरनिनको धबधब्यावर पावसाळ्यात वर्षासहलीचा आनंद घेण्यासाठी येणार्या पर्यटकांनी स्वतःची काळजी घेऊन धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेणे अत्यंत गरजेचे आहे.