

खेड : तालुक्यात यंदा पाणीटंचाईच्या संकटावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले. जिल्हा प्रशासनाच्या पाणीटंचाई आराखड्यानुसार यावर्षी केवळ 16 गावांतील 19 वाड्यांनाच टंचाईची झळ बसली. यामधील 1,399 ग्रामस्थांच्या तहान भागवण्यासाठी एका टँकरने 51 दिवसांत एकूण 83 फेर्या करून पाणीपुरवठा केला.
तळे-पालांडेवाडी हे सर्वाधिक प्रभावित वाडे ठरले, जिथे 250 ग्रामस्थांना टँकरच्या पाण्यावर दिवस काढावे लागले. मात्र, जलजीवन मिशन अंतर्गत राबवण्यात आलेल्या नळपाणी योजना आणि नव्या विहिरींमुळे अनेक वाड्यांना दिलासा मिळाला. सुसेरी-देवसडे येथे विहीर खोदण्यात आल्यानंतर कदमवाडी, जाधववाडी, वैरागवाडी, बौद्धवाडी, सावंतवाडी आणि मधलीवाडी या वाड्यांची पाण्यासाठीची भटकंती थांबली.पोसरे-सडेवाडी आणि मूळगाव-देऊळवाडी येथील वाड्यांमध्ये नव्या नळपाणी योजनांमुळे टँकरची गरजच भासली नाही. यामुळे 3 गावांतील 8 वाड्यांची टँकरमुक्ती झाली आहे. 23 मेपासून टँकरची गरज संपली असून, 3 एप्रिल रोजी झालेल्या पावसामुळे टंचाईग्रस्त वाड्यांनाही मोठा दिलासा मिळाला.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणी टंचाईग्रस्त ग्रामस्थांची संख्या 4,662 वरून फक्त 1,399 वर आली असून, टँकर फेर्याही 230 वरून 83 वर घटल्या आहेत. यामुळे पाणी पुरवठ्याच्या खर्चात मोठी बचत झाली असून प्रशासनाला ही कामगिरी दिलासा देणारी ठरली आहे.