

खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहती मधील कारखान्यात प्रक्रिया केल्यानंतर तयार होणाऱ्या घातक घन कचऱ्याची विल्हेवाट धोकादायक पद्धतीने लावण्याचे काही प्रकार गेल्या काही वर्षात निदर्शनास येत आहे. तालुक्यातील बोरज गावातून अशा प्रकारची तक्रार नुकतीच उपविभागीय अधिकारी खेड व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे करण्यात आली आहे.
खेड तालुक्यातील बोरज गावातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या ब्रिटिश कालीन बोरज धरणाच्या परिसरात एका खासगी डोंगर भागात रासायनिक कारखान्यांमधून आणलेला घातक घनकचरा आणि राख टाकण्यात आल्याची तक्रार प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे करण्यात आली आहे. हा प्रकार अज्ञात व्यक्तीने धरणाच्या तलावा पासून काही अंतरावर केल्याची चर्चा असून पावसाळ्यात या रसायन मिश्रित घन कचऱ्यातून पावसाच्या पाण्यासोबत खेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरज धरणात रसायन मिसळून पेयजल दूषित होण्याचा धोका आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थ परेश शिंदे यांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळासोबतच खेडचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे देखील याबाबत लेखी तक्रार दिली आहे.
धरण परिसरात घातक रासायनिक कचरा टाकल्याची बाब समोर आल्यानंतर या धरणाचे पाणी जे शहरवासीय पितात त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रशासन हे भयानक कृत्य करणाऱ्यावर काय कारवाई करते आणि या धरणाला दूषित होण्यापासून काय उपाययोजना करते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.